जम्मू-काश्मीरमध्ये अकोल्यातील २४ वर्षीय जवान प्रवीण जंजाळ शहीद

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी रात्री भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले असून दोन जवान शहीद झाले असल्याची माहिती सैन्यातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. शहिदांमध्ये अकोला जिल्ह्यातील 24 वर्षीय जवान प्रवीण जंजाळ यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. याशिवाय पहिल्या चकमकीत भारतीय जवानांना गंभीर जखम झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांशी लढताना अकोला जिल्ह्याच्या प्रवीण जंजाळ जवानाला वीरमरण आल्याची माहिती मिळत आहे. रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांनी मोरगाव भाकरे येथील सरपंच उमाताई ज्ञानेश्वर माळी यांच्यासोबत संपर्क साधून प्रवीण यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि प्रवीण यांना हौतात्म्य आल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. त्यामुळे जंजाळ कुटुंब व मोरगाव भाकरे गावावर दु:खाचा डोंगार कोसळला आहे.

दरम्यान, प्रवीण यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे. प्रवीण जंजाळ हे चार महिन्यांपूर्वीच गावी सुट्टीवर आले होते. या सुट्टीतच त्यांचा विवाह झाला होता. ही भेट प्रवीण यांची शेवटची ठरली. प्रवीण जंजाळ हे सेकंड महार रेजिमेंटमध्ये 2020 मध्ये भरती झाले होते. त्याची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती. चार महिन्यांपूर्वी सैन्यदलाच्या राष्ट्रीय रायफलच्या (विशेष दस्ता) क्रमांक एकच्या तुकडीत कुलगाम जिल्ह्यात त्यांना पाठवण्यात आले होते.

या पथकासोबतच कुलगाम जिल्ह्यातील मोदरगम येथे शनिवारी दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. इथे सहा दहशतवादी असल्याची माहिती होती. चौघांना ठार केल्यानंतर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या अंधाधुंद गोळीबारात प्रवीण यांच्या डोक्याला गोळी लागल्याची माहिती आहे. यातच त्यांना हौतात्म्य आले, अशी माहिती रेजिमेंटतर्फे कुटुंबीयांना देण्यात आली.

Protected Content