रायगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रायगड जिल्ह्यातील उरण येथील एन आय स्कूलजवळ प्रेम प्रकरणातून यशश्री शिंदे नामक एका २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर आरोपी पळून गेला असून, तो बंगळुरू येथे दबा धरून बसला असावा असा अंदाज आहे. या घटनेमुळे उरण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २५ जुलैपासून यशश्री शिंदे बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह आज कोटनाका पेट्रोल पंपाजवळ छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला. या घटनेची पोलिसांना शनिवारी पहाटे मिळाली. त्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. तसेच पुढील सोपस्कारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पोलिस आरोपीला लवकरच अटक करतील. पण नागरिकांनी पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी केले.