Home Cities जळगाव नशिराबादमध्ये २०० वर्षांची परंपरा जपली ; बारागाड्या ओढण्याचा सोहळा जल्लोषात 

नशिराबादमध्ये २०० वर्षांची परंपरा जपली ; बारागाड्या ओढण्याचा सोहळा जल्लोषात 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद येथे गेल्या दोन शतकांपासून चालत आलेल्या बारागाड्या ओढण्याच्या पारंपरिक सोहळ्याला यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त आयोजित या सोहळ्याने संपूर्ण परिसरात श्रद्धा आणि परंपरेचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला.

शुक्रवार, ३ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता ‘श्रीं’च्या मूर्तीचा पंचामृताने अभिषेक करून धार्मिक विधींना प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर ‘सदानंदाचा येळकोट’, ‘येळकोट येळकोट जयमल्हार’ आणि ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’ अशा गजरात बारागाड्या ओढण्याचा पारंपरिक सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी युवराज मोतीलाल धोबी यांनी बारागाड्या ओढण्याचा मान पार पाडला.

सोहळ्यादरम्यान भाविकांनी मोठ्या उत्साहात भंडारा उधळत खंडोबाचा जयजयकार केला. संपूर्ण परिसर हळदीच्या पिवळ्या रंगाने न्हाऊन निघाला होता. श्रद्धा, भक्ती आणि देवावरील अढळ विश्वास यामुळे महिला, लहान मुले, तरुण-तरुणी अशा सर्व स्तरांतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या सोहळ्यामुळे नशिराबादमध्ये एक वेगळेच धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते.

खंडेराव महाराज यात्रोत्सवात नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांच्यासह सर्व नगरसेवक आणि विविध राजकीय पदाधिकारी श्रद्धेने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला अधिकच उत्साह प्राप्त झाला.

गेल्या दोनशे वर्षांपासून धोबी घराण्याकडे बारागाड्या ओढण्याचा मान असून ही परंपरा पिढ्यान्पिढ्या जपली जात आहे. (कै.) रघू धोबी, शंकर रघू धोबी, गणपत शंकर धोबी आणि दामू शंकर धोबी यांनी सलग ३५ वर्षे ही परंपरा जोपासली. त्यानंतर मोतीलाल संपत धोबी यांनी १२ वर्षे, तर माजी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ऊर्फ सुदाम धोबी यांनी पाच वर्षे ही जबाबदारी पार पाडली. सध्या युवराज मोतीलाल धोबी गेल्या तीन वर्षांपासून ही परंपरा पुढे नेत आहेत.

खंडेराव महाराज यात्रोत्सवाचे अध्यक्ष चंद्रकांत भोळे, उपाध्यक्ष किशोर पाटील, खजिनदार ज्ञानदेव लोखंडे तसेच कार्यकारी मंडळातील सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. नशिराबादसह परिसरातील खेड्यांमधून हजारो भाविकांनी उपस्थित राहून या पारंपरिक सोहळ्याचा आनंद लुटला.


Protected Content

Play sound