जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव खुर्द गावातील एका भागात राहणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी राज संतोष कोळी वय-१९ रा. जळगाव खुर्द याला जळगाव जिल्हा न्यायालयाने २० वर्षे सश्रम करावास व १५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा बुधवारी २२ मे रोजी दुपारी ३ वाजता सुनावली आहे.
जळगाव तालुक्यातील जळगाव खुर्द गावात आरोपी राज कोळी हा वास्तव्याला आहे. २० ऑक्टोबर २०२१ रोजी गावातीलच एका भागात राहणाऱ्या ६ वर्षीय व ७ वर्षीय या दोन सख्ख्या चुलत बहिणींना राज कोळी याने त्याच्या घरी बोलून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीवर जळगाव जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांच्या न्यायालयात खटला चालवण्यात आला. या खटल्यात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. यात दोन्ही पीडित अल्पवयीन मुली आणि त्यांची आई यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायमुर्ती एस. एन. राजूरकर यांनी राज संतोष कोळी याला दोषी ठरवत वेगवेगळ्या कलमान्वये २० वर्षे सश्रम कारावास आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. चारुलता बोरसे यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून ताराचंद जावळे यांनी सहकार्य केले.