जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । खेळाडू वीज कर्मचाऱ्यांसाठी महावितरणच्या वतीने 1 ते 4 फ़ेब्रृवारी 2024 रोजी छत्रपती संभाजी नगर येथे आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. संपूर्ण राज्यभरातून आलेल्या खेळाडू वीज कर्मचाऱ्यांतून जळगांव परिमंडलातील दोन खेळाडूंनी सुवर्ण पदक तर तीन खेळाडूंनी रौप्य पदक पटकावले. स्पर्धेत खो-खो क्रीडा प्रकारात जळगांवचा महिला संघ उपविजेता ठरला.
महावितरणच्या जळगांव विभागातील अबरार अशपाक पटेल (वरिष्ठ तंत्रज्ञ) याने 1500 मीटर धावणे स्पर्धेत तर धरणगांव विभागातील भानुदास शंकर वसावे (तंत्रज्ञ) याने कुस्तीच्या 125 वजनी गटातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकावले.
जळगावच्या सावदा विभागातील विजय उत्तम बाहरे (विद्युत सहाय्यक) याने 400 मीटर धावणे स्पर्धेत व याच विभागातील परेश दिगंबर चौधरी याने 800 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदक मिळवले. धरणगांव विभागातील योगेश शांताराम मनोरे (वरिष्ठ तंत्रज्ञ) यास 65 किलो वजनी गटातील कुस्ती या क्रीडा प्रकारासाठी रौप्य पदक देण्यात आले.
स्पर्धेत जळगांव परिमंडलातील महिला वीज कर्मचाऱ्यांचा खो-खो संघ उपविजेता ठरला. यात जळगांवच्या रिना एम. बिश्वास (तंत्रज्ञ – जळगांव नवी पेठ), सपना पी वानखेडे (सावदा विभाग- विद्युत सहाय्यक), संजना महेंद्र पाटील (धरणगांव विभाग- विद्युत सहाय्यक), माधुरी एस भालेराव ((सावदा विभाग- विद्युत सहाय्यक) व प्रिती मिलींद पानपाटील (जळगांव) यांचा समावेश होता. जळगांवच्या या उपविजेत्या संघात उर्वरित खेळाडू नाशिक परिमंडलातील होते. जळगांव व नाशिक परिमंडलातील खो-खो खेळाडू एकत्रितरित्या खेळले. सर्व विजेत्या खेळाडूंचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी अभिनंदन केले.
1 फ़ेबृवारी 2024 रोजी छत्रपती श्री संभाजी नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानात या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्दघाटन महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांच्या हस्ते झाले. तर बक्षिस वितरण संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर यांच्या हस्ते झाले. दोन्ही कार्यक्रमास संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, सुहास रंगारी, मुख्य अभियंता डॉ. मुरहारी केळे, कैलास हुमणे, सूंदर लटपटे यांच्यासह मुख्य अभियंते, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जळगांव परिमंडलातून 55 खेळाडू सहभागी झाले होते. मुख्य अभियंता यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या खेळाडू कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थेसाठी उपमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी विशाल पिपरे, मुख्य लिपिक गणेश पवार, निम्नस्तर लिपिक प्रिती पानपाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.