जळगाव प्रतिनिधी । शास्त्री टॉवर ते अजिंठा चौफुली रोडवरील पुष्पलता बेंडाळे चौकात असलेल्या व्यापारी संकूलातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या १८ गाळे न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने आज गुरूवार १ जुलै रोजी सकाळी १० वाजता पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेतले आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी दिली.
शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील जिल्हा परिषद अल्पबचन भवनात असलेले १८ गाळे हे जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे. या गाळ्यांची २२ मार्च २०१८ रोजी मुदत संपली होती. मुदत संपल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने गाळे खाली करून दुकानाचे भाडे देण्यासाठी नोटीसही दिली होती. त्यानंतर तोंडी व लेखी माहितीही देण्यात आली. दरम्यान आता कोणताही करार अस्तित्वात नसल्याने बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवण्यात आलेल्या दुकाने सोडावे, असे नोटीसीत नमूदही केले होते. यासाठी जिल्हा परिषदेने पाठविलेल्या नोटीसाच्या विरोधात सर्व गाळेधारक जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान १७ जुलै २०१९ रोजी न्यायालयाने निकाल देवून कायदेशिररित्या मार्गाने गाळे ताब्यात घेण्याचे आदेश केले आहे. बेकायदेशीर दुकाने ताब्यात ठेवून आणि करार संपल्यापासून आजपर्यंतचा ५ पट दंडासह एकुण १ कोटी ८३ लाख ६८ हजार ४७३ रूपयांचा दंड ठोठावला आहे. २५ डिसेंबर २०२० रोजी नोटीस बजावण्यात आल्यानंतर आता आज गुरूवारी १ जुलै २०२१ रोजी सकाळी १० वाजता पोलीसांच्या मदतीने नियमाप्रमाणे सर्व कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी.एन. पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, कार्यकारी अभियंता नंदकुमार पवार, गटविकास अधिकारी एस बी सोनवणे, जिल्हापरिषदेचे कायदेशीर सल्लागार अँड. हरुल देवरे, कर्मचारी व पोलिस बंदोबस्त यांच्यासह गाळे ताब्यात कारवाई केली.