मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गुटखा देण्यास नकार दिल्यामुळे मुलुंड परिसरात तीन अनोळखी व्यक्तींनी १७ वर्षीय मुलाची भोसकून हत्या केली. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या अटकेसाठी चार पथके तयार करण्यात आली आहे.
मोहम्मद हुसेन ताज हुसैन खानअसे मृत मुलाचे नाव असून त्याचे चार मित्र मुलुंड पश्चिम येथील वसंत गार्डनवरील डोंगराळ भागात शुक्रवारी गेले होते. तक्रारीनुसार, तेथे त्यांना वाटेत तीन अनोळखी व्यक्तींनी अडवले व त्यांच्याकडे गुटख्याची मागणी केली. गुटखा नसल्यामुळे त्यांनी नकार दिला. गुटखा न दिल्यामुळे संतापलेल्या तीनही आरोपींनी सर्व मित्रांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी लाल रंगाचे टीशर्ट घातलेल्या व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून हुसैन ताज खान यांच्याकडून पैसे काढून घेतले. त्याला विरोध केला असता आरोपीने खानच्या छातीत व पायावर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेला खान खाली कोसळला. त्याला अग्रवाल रुग्णालायात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी खानला मृत घोषित केले. याप्रकरणाची पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी अपमृत्यूची नोंद केली होती. पोलिसांनी खानचा मित्र अब्दुल हादी अन्सारी (१६) याचा जबाब नोंदवला. त्यावेळी त्याने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्याच्या तक्रारीवरून याप्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखाही समांतर तपास करीत आहे.
घडलेल्या प्रकाराची माहिती सर्व मुलांकडून घेण्यात आली असून ते भांडुप येथील रहिवासी आहे. डोंगराळ भागातील धबधब्यात भिजण्यासाठी ते जात असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींच्या वर्णनावरून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात हल्लेखोर तरूण असून गुटख्यावरून वाद झाल्यानंतर आरोपींनी हल्ला केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्तांनी घटनास्थळाला भेट देऊन याप्रकरणी तपासणी केली.