मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नायगाव पोलिसांनी एका वाहनातून १६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे तर तिसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.काही इसम शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती नायगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नायगाव पूर्वेच्या अंजता इमारतीसमोर सापळा लावला होता. रविवारी रात्री पोलिसांनी संशयास्पद वाहन अडवून तपासणी केली. त्या वाहनात पोलिसांनी १६ जिवंत काडतुसे आढळून आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कल्पेश वैती आणि नरेश नांदरूकर या दोघांना अटक केली आहे.
वाहनात असलेला त्यांचा तिसरा साथीदार विकी म्हात्रे हा फरार झाला आहे. सर्व आरोपी हे भिवंडी येथे राहणारे असून सराईत गुन्हेगार आहे. त्यापैकी एकावर हत्या आणि हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. तिसर्या आरोपीचा शोध सुरू आहे. पिस्तुल या तिसर्या आरोपीकडे असण्याची शक्यता आहे, अशी माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली. सर्व आरोपी सराईत असून त्यांच्या ताब्यात ही काडतुसे सापडल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, असे त्यांनी सांगितले. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, वाहन, महागडा मोबाईल असा एकूण २६ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.