राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आठ महिन्यात हृदयाच्या १६ शस्त्रक्रिया पूर्ण

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमां’तर्गत हृदयाच्या १६ मोफत शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत.

जळगाव येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमां’तर्गत मागील आठ महिन्यात २९ मुलांना हृदय शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता वैद्यकीय पथकाच्या तपासणी व निदानात दिसून आली आहे. यातील १६ मोफत शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या असून १३ कार्यवाहीच्या टप्प्यात आहेत. ‘लवकर निदान, लवकर उपचार’ सूत्रानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात वैद्यकीय पथकांमार्फत तपासणी कायम सुरु आहे. त्यातून मुलांचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात विविध अंगणवाडी आणि विद्यालयांमध्ये बालकांची आरोग्य तपासणी केली जात असते. यासाठी जिल्ह्यात ४६ आरोग्य पथके कार्यरत आहेत. एक पथकात प्रत्येकी एक स्त्री व पुरुष वैद्यकीय अधिकारी, १ औषधनिर्माता, १ परिचारिका यांचा समावेश असतो. विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीत वैद्यकीय सल्ल्यानुसार सिटी स्कॅन, एमआरआय, रक्ताच्या विविध चाचण्या तसेच आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रियेची देखील तरतूद ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’अंतर्गत आहे.

‘राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमां’तर्गत ० ते १८ वयोगटामधील बालकांची तपासणी केली जाते. एप्रिल ते नोव्हेंबर २०२१ या आठ महिन्यात २९ मुलांना तपासणीदरम्यान हृदय शस्त्रक्रियांची आवश्यकता दिसून आली आहे. त्यातील १६ जणांची तपासणी पूर्ण झाली असून १३ शस्त्रक्रिया कार्यवाहीच्या टप्प्यात आहेत. तसेच या आठ महिन्यात इतर ७२ शस्त्रक्रिया करण्याचे वैद्यकीय पथकाच्या निदानात दिसून आले असून त्यातील ४२ पूर्ण झाल्या आहेत. तर ३० शस्त्रक्रिया कार्यवाहीच्या टप्प्यात सुरु आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक वर्षा वाघमारे कामकाज पाहत आहे.

Protected Content