जळगाव-संदीप होले । जळगाव शहरातील रथोत्सवाला तब्बल १५१ वर्षांची परंपरा असून सन १९४० पासून कै. काशिनाथ जयराम पाटील हे जळगाव शहराचे पोलीस पाटील होते, त्यांनी ब्रिटिश काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळात ३७ वर्षे सलगपणे पोलीस पाटील पदाचा भार सांभाळला होता.
काशिनाथ जयराम पाटील हे भारदस्त व्यक्तिमत्व होते, पिळदार मिशी, भारदार शरीरयष्टी डोक्यावर फेटा बांधुन ते रथोत्सव असो व वहनउत्सव असो सर्वात पुढे ते उपस्थित असत. त्याकाळी त्यांचा एक दसरा होता, गोरगरीबांना मदत करणारे व नाठाळयांच्या पाठी असो त्यांचा त्याकाळी धाक होता. पोलीस पाटील पदावर असतांना ते नेहमी घरप्रपंच सांभाळुन शेती, गुरेढोरे यांची कामे करुन जळगांव शहरामध्ये पोलीस पाटील म्हणुन काम करत असतांना समाजात सलोखा कसा राहिल, बंधुभाव कसा राहिल याकडे त्यांचा कल असायचा. त्यांची ही परंपरा त्यांचे पश्चात त्यांचा मुलगा प्रकाश काशिनाथ पाटील यांनी ३० वर्ष जळगांव शहराचे पोलीस पाटील म्हणुन सांभाळली होती. त्यांचे उंच शरीरयष्टी भारदार व्यक्तिमत्व व पिळदार मिशी असे वडीलांप्रमाणे त्यांचेही व्यक्तिमत्व होते. त्यांनी रथोत्सव वहन उत्सव अखंडपणे सेवा केली, त्यांचे बरोबर त्यांचे बंधु नारायण काशिनाथ पाटील, प्रभाकर काशिनाथ पाटील, पंडीत काशिनाथ पाटील व हेमराज काशिनाथ पाटील हे देखील दरवर्षी प्रत्येक रथोत्सवात, वहनोत्सवात सहभाग घेत असतात. आपली सेवा देत असतात. त्यानंतर आता त्यांची काशिनाथ जयराम पाटील यांची तिसरी पिढी सुजित प्रकाश पाटील, ललित पंडीत पाटील, ज्ञानेश्वर नारायण पाटील, जितेंद्र प्रभाकर पाटील, अशोक प्रभाकर पाटील, शिवाजी प्रभाकर पाटील, जयेश हेमराज पाटील रात्रंदिवस रथोत्सव, वहनोत्सव तयारीसाठी उत्सवाच्या दिवशी सर्व कामे मोठया उत्साहाने करुन हातभार लावत असतात. पाटील कुटुंबाची चौथी पिढीही पुढेही परंपरा जोपासेल यात शंका नाही.
प्रकाश काशिनाथ पाटील यांचे पश्चात प्रभाकर काशिनाथ पाटील हे आपले वडीलांचे नंतर, भावानंतर पोलीस पाटील म्हणुन धुरा मोठया उत्साहाने सांभाळत असुन दरवर्षी रथोत्सव व वहनोत्सव नेतृत्व करीत आहे. कार्याध्यक्ष या नात्याने ते सर्व जबाबदारी मोठ्या शिताफीने पार पाडत आहे. त्यांचेही कर्तुत्व रथोत्सवात व वहनोत्सवात मोठे आहे. समाजात या उत्सवाहामुळे बंधुभाव, सलोखा, आपसातील प्रेमभाव वाढीस लागत आहे.