जळगाव प्रतिनिधी । कुटूंब घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने खिडकीतून हात टाकत घरातून १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याची घटना वाघ नगरातील माउली नगरात २५ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली आहे. तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघनगर भागातील माउली नगरात संतोष गिरधर पाखरे (वय-४७) हे कुटूंबिंयासह वास्तव्यास आहेत. मजुरी करून कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी २४ मार्च रोजी रात्री जेवण झाल्यानंतर त्यांनी मोबाईल हा खिडकीजवळ ठेवला होता. मध्यरात्री पाखरे कुटूंबिय झोपलेले असताना सुमारे मध्यरात्री २ ते ४ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने पाखरे यांचा खिडकीत ठेवलेला १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविला. गुरूवारी २५ मार्च रोजी सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर पाखरे यांनी तालुका पोलीस गाठत संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.