जळगाव प्रतिनिधी । कंपनीत काम करण्यासाठी बोलावलेल्या परप्रांतीय कामगारांनी अवघ्या सहा दिवसच कंपनीत काम करुन कंपनी मालकाने उपलब्ध करुन दिलेल्या रुममधील जेवणाचे भांडे, तसेच लाईटस्, दोन पंखे असा एकूण 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना एमआयडीसीतील डी-सेक्टर येथे समोर आली आहे.
दरम्यान कंपनी मालकाने संबंधितांना किराणा तसेच रुमभाडे यासह अडव्हॉन्स म्हणून काही रक्कमही दिली होती. रक्कम घेवूनही कामगारांनी पोबारा केला आहे. याप्रकरणी मयुरेश गारमेंट कंपनीच्या मालक किर्ती माणिकराव वारके वय 41, रा नेहरुनगर, मोहाडी रोड यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे.
मालकाने रुमखोलीसह साहित्य दिले
एमआयडीसी डी सेक्टर 26 येथे किर्ती वारके यांची रेडीमेड गारमेंटस बनविण्याची फॅक्टरी आहे. या कंपनीत वारके यांनी धुळे येथील बी.आर.फॅशन येथे काम करीत असलेले दिनेश त्रृषी रा. शिरपूर व किशोर पाटील रा. शिरपूर यांच्या मध्यस्थीने कंपनीत कामगारांची आवश्यकत असल्याने 15 ऑगस्ट रोजी गोरखपूर येथील 8 कामगार बोलावले होते. यात महेंदर जगदीश , इतवारी लल, उमेश रामसेवक, सुरेंद्रसिंग (पूर्ण नाव माहिती नाही), संतोष रामसेवक, राब छबीला चौधरी, मुमताज नासिर, नरेंद्र (पूर्ण नाव माहिती नाही) यांचा समावेश आहे. 16 रोजी आठही कामगार कंपनीत आले. त्याला राहण्यासाठी अशोक किराणा परिसरात कंपनी मालक किर्ती वारके यांनीच वन रुम किचन रुम भाडे करारावर करुन दिली होती. याबरोबरच 3500 रुपये खोलीभाडेही दिले. तसेच सदर कामगारांना किराणा घेण्यासाठी 28 हजार रुपयेही दिले. व जेवणासाठीचे आवश्यक ताट, कुकर, मोठी भांडे, कढई, चमचे हे भांडेही देण्यात आले होते. तसेच कामाची अॅडव्हान्स रक्कम म्हणून किशोर पाटील यांच्याकडे 6 हजार रुपये, इतर कामगारांना आठ हजार रुपयेही वारके यांनी दिले होते.
तीन दिवसच काम करुन झाले पसार
कामगारांनी कंपनीत 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट असे तीन दिवस काम केले. यावेळी किशोर पाटील त्यांच्यासोबत रहायला हाता. 20 ऑगस्ट रोजी अर्धादिवस काम करुन कामगार खोलीवर निघून गेले. 21 ऑगस्ट रोजी किर्ती वारके या सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी कंपनीत गेले. कंपनीत कामगार दिसून आले नाही. त्यामुळे वारके यांनी कामगार राहत असलेल्या अशोक किराणा परिसरात घर गाठले. याठिकाणी खोलीचा दरवाज उघडा होता. खोलीत कुणीही नव्हते. खोलीतील भाडे, लाईटस्सह पंखेही असा 14 हजार रुपयांचा ऐवजही गायब होता. याबाबत वारके यांनी मध्यस्थी दिनेश त्रृषी व किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही उडवाउडवीचे उत्तरे दिली. कामगारांनी सदरचा माल लांबविला असून फसवणूक केल्याची खात्री झाल्याने गोरखपूर येथील 8 कामगारांसह वारके यांनी दिनेश त्रृषी व किशोर पाटील यांच्या विरोधात 25 ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.