नवी मुंबई वृत्तसंस्था । कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्यात आला असून आता कांदाचे 130 कंटेनर जेएनपीटी बंदरावर दाखल झाले आहेत. त्यातील इजिप्त, तुर्की, थायलंडहून आलेले कांद्याचे 4 कंटेनर मुंबई एपीएमसी बाजारात आला आहे.
इजिप्त आणि थायलंडच्या कांद्याची किंमत प्रति किलो 50 ते 80 रुपये विकला जात आहे, तर महाराष्ट्र आणि गुजरातचा कांदा 60 ते 80 रुपये किलोने विकला जात आहे. परदेशातून आलेल्या कांदा आणि महाराष्ट्रातील कांद्याचा सरासरी भाव एकच दिसून येत आहे. ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आणि व्यापारी परदेशातून कांद्याची आयात करण्याची गरज काय, असा सवाल विचारत आहेत. परदेशातून कांदा आपल्याकडे येणे हे काही आता नवीन राहिलेले नाही. यापूर्वीही अनेकदा बाजारात इजिप्त, अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान या ठिकाणाहून कांद्याची आवक झाली आहे. त्यामुळे परदेशातील कांदा कसा आहे, हे आता अनेक व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांना कळून चुकले आहे. परदेशातील कांद्याला आपल्या कांद्याची सर नाही. आपल्या कांद्यात असलेला तिखटपणा आणि चव अन्य ठिकाणच्या कांद्याला नाही. त्यामुळे इतर कुठल्याही ठिकाणांहून कांदे आले तरी त्यांना महाराष्ट्रातील कांद्याची सर येत नाही. त्यामुळे आपल्याकडील ग्राहकांना इतर ठिकाणचे कांदे पसंती देत नाहीत.