पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी। पहूर येथे आज १३ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले असून यात एकाच कुटुंबातील १० रूग्णांचा समावेश आहे.
पहूर येथे कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी कार्यान्वित झाली असून आज गुरुवारी एकाच कुटुंबातील १० जणांसह एकूण १३ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्यांनी दिली. आज गुरुवारी पहूर ग्रामीण रुग्णालयात एकूण ३४ जणांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या. यातील ६ जणांचे अहवाल
पॉझीटीव्ह आले आहेत. त्यात पहूर पेठ येथील २ ,पहूर – कसबे येथील १, सुनसगांव येथील १, कळमसरा येथील १ नाचण खेडा येथील १ जणाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. तर २८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पहूर कसबे येथील एकाच कुटुंबातील १० जणांचे अहवाल वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत.
पहूर मध्ये कोरोनाचा कहर
पहूर पेठ आणि पहूर कसबे येथे कोरोनाने जणू काही कहरच केला आहे. आज पहूर कसबे येथील ११ आणि पहूर पेठ २ असे एकूण १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आतापर्यंत पहूरची एकूण बाधितांची संख्या ११९ झाली आहे. ग्रामस्थांनी कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य , ग्रामपंचायत, तसेच पोलीस प्रशासनाने केले आहे.
पहूर येथील भूमीपूत्र तथा ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र प्रल्हाद वानखेडे हे तीन सहकारी वैद्यकीय अधिकारी बाधित आढळल्यावरही मोठ्या हिम्मतीने अहोरात्र रुग्णसेवा देत असून त्यांना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हर्षल चांदा यांच्यासह डॉ. कुणाल बाविस्कर, डॉ. स्वप्नील बारी,परिचारक, परिचारीका व संपूर्ण स्टाफचे उत्तम मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. कोरोना योद्धे डॉ. जितेंद्र वानखेडे यांच्या या रुग्णसेवेतील योगदानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बाजारात वाढती गर्दी
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बाजार भरविण्यास बंदी घातलेली आहे .कोरोना विषाणू संक्रमणाची वाढती संख्या लक्षात घेता येत्या रविवारी बस स्थानक परिसरात बाजार भरविण्यात येवू नये अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे . ग्रामपंचायत प्रशासनासह पोलीस विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे .
पोळ्यावर कोरोनाचे सावट
दरम्यान, गेल्या चार – साडे चार महिन्यांपासून सर्वच सण – उत्सवांवर कोरोनाचे सावट दिसून आले आहे. शासकीय नियमांचे पालन करत जनतेने आपल्या भावना आणि कर्तव्य यांचा योग्य समन्वय साधून कोरोना सारख्या कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. अशा परिस्थितीत येणार्या पोळा उत्सवातही जनतेने संयम बाळगून पोळा सणा निमित्त आपल्या घरीच बैल पुजन करावे. पारंपारिक पद्धतीने सार्वजनिक स्वरूपात सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यास बंदी असल्याने पोळा सण आपापल्या घरी शांततेत साजरा करावा,असे आवाहन पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी केले आहे.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update