चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यात हाहाकार माजवला आहे. त्यात मृत्यूच्या दरात झपाट्याने वाढ झालेली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जोपासत भारतीय बंजारा क्रांति दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग राठोड यांनी स्वखर्चाने तालुक्यात निर्जंतुकीकरणासाठी फवारणीला सुरुवात करून माणूसकीचा संदेश दिला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भारतीय बंजारा क्रांति दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग राठोड यांनी तालुक्यात स्वखर्चाने निर्जंतुकीकरण फवारणीला सुरुवात केली आहे. मोरसिंग राठोड हे प्रसिद्ध उद्योजक असून तालुक्यातील लोणजे तांड्याचे ते भूमिपुत्र आहे. त्यांच्या या वाखाणण्याजोगा कार्याबद्दल संबंध बंजारा समाज भरभरून कौतुक करत आहे. या अभियानांतर्गत अद्यापपर्यंत लोणजे तांडा, आंबेहोळ, लोणजे गांव, तळोंदे प्र.चा, पाथरदे, बोढरे, सांगवी, खेरडे, सोनगांव, बाणगांव, रांजणगांव, पिंपरखेड, गोरखपुर, वलठाण आदी गावांत सॅनेटाईझरची फवारणी करण्यात आली आहे. तसेच आता पिंपरखेड – पाटणा परिसरातील गांवामध्ये फवारणी हि सुरू आहे. या मोहिमेला पिंपरखेड ग्रामपंचायत सदस्य रवि मोरे यांनी परिश्रम घेतले असून फवारणी त्याच्या अखत्यारीत सुरू आहेत. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेतून कार्य सुरू असल्याचे प्रतिपादन भारतीय बंजारा क्रांति दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग राठोड यांनी केले आहे. त्याचबरोबर आगामी काळात इतरही गावात हि मोहीम राबविण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.