पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुणे जिल्ह्यात मानव बिबट्या संघर्ष वाढला आहे. पुण्यात शिरुर तालुक्यात दहिवडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. यश सुरेश गायकवाड (वय ११) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात रोष व्यक्त केला आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे नागरिकांवरील हल्ले वाढले आहेत. जुन्नर तालुक्यात गेल्या महिन्यात एका मुलीचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांना शिरुर तालुक्यात एका ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने नागरिक दहशतीत आहेत. मृत यश सुरेश गायकवाड (वय ११) हा पाचवीत शिक्षण घेत होता. तर तो त्यांच्या आई वडिलांसोबत दहिवडी गावातील देवमळा परिसरात राहायला आहे.
आज सकाळी तो नैसर्गिक विधीसाठी घराच्या मागील बाजूस असलेल्या उसाच्या फडात गेला होता. मात्र, तो बराच वेळ झाला, तरी घरी परतला नाही. यामुळे कुटुंबियांची चिंता वाढली. दरम्यान, त्याच्या आई वडिलांनी व कुटुंबीयांनी तसेच काही ग्रामस्थांनी यशचा आजूबाजूला शोध घेतला. यावेळी यश उसाच्या फडात मृतावस्थेत सापडला. त्याच्या शरीराचा काही भाग बिबट्याने खाल्ला होता. दरम्यान, हा हल्ला बिबट्याने बिबट्याने केल्याचे उघड झाल्यानंतर दहिवडी गावावर शोककळा पसरली. या सोबतच येथील नागरिकांत दहशत देखील निर्माण झाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून शिरुर तालुक्यातील दहिवडी गाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. या भागात दिवसा ढवळ्या बिबट्याचे दर्शन होते. या भागात दाट झाडी, उसाचे फड असल्याने बिबट्यासाठी लपण्याची ठिकाणे भरपूर आहेत. वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली असून ग्रामस्थांनी केलेल्या मागणी नुसार या ठिकाणी सहा पिंजरे व ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच बिबट्याच्या शोध घेण्यासाठी ड्रोनची देखील मदत घेलती जाणार आहे. बिबट्याच्या पावलांचे ठसे घेण्यात आले असून यशचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबतची माहिती शवविच्छेदन अहवालाद्वारे मिळेल, असे जगताप म्हणाले.