नागपूरमध्ये रंगणार १० वे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिनांक २६ व २७ एप्रिल २०२५ रोजी नागपूरमधील मातोश्री विमलताई देशमुख सभागृह, धनवटे नॅशनल कॉलेज येथे १० वे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन भव्य आणि वैचारिक वातावरणात रंगणार आहे. “शाश्वत मूल्यांच्या संवर्धनार्थ” या उद्घोषणेसह होणाऱ्या या संमेलनात देशभरातील साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक, पत्रकार आणि कवी सहभागी होणार आहेत.

संमेलनाचे अध्यक्षपद माजी कुलगुरू आणि एमआयटी पुणेचे सल्लागार डॉ. एस.एन. पठाण भूषवणार आहेत. उद्घाटन सत्रात प्रा. डॉ. अनुपमा उजगरे (मुंबई) यांचे विशेष भाषण होणार असून त्या मराठीतील मुस्लीम साहित्यप्रवाहाबद्दल आपले विचार मांडतील. स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. शरयू तायवाडे, मुख्य आमंत्रक प्रा. जावेद पाशा कुरेशी, सचिव अय्युब नल्लामंदू, आणि संयोजन समितीतील विविध पदाधिकारी संमेलनाचे आयोजन साकारत आहेत.

पहिल्या दिवशी सकाळी उद्घाटन सत्रात विविध पुस्तकांचे प्रकाशन होणार असून त्यात “मन्हाठवाणी” स्मरणिका, “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज”, “हिंदुत्व आणि धर्मांतरित मुस्लीम पुढील आव्हाने”, “कासिद” विशेषांक, “सावी” बाल कादंबरी, “ती मशिद”, “आम्ही जिहादी”, “शब्द सारथी”, आणि “उतार वयातील चढण” या साहित्यकृतींचा समावेश असेल.

दुपारी ‘मध्ययुगीन मुस्लीम मराठी संतांचे समतावादी साहित्य’ आणि ‘फुले-शाहू-आंबेडकरी साहित्यप्रवाहाशी बांधीलकी’ या परिसंवादांद्वारे वैचारिक बैठक होणार आहे. संध्याकाळी ‘मिर्झा एक्सप्रेस’ सादरीकरण, ‘सन्माननीय षंढानो’ नाटक आणि एक भव्य राष्ट्रीय बहुभाषिक मुशायरा होणार आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ कवी सिराज शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील नामवंत कवी गझलसादर करणार आहेत.

दुसऱ्या दिवशी सकाळी ‘कथाकथन’ सत्राने सुरुवात होईल. अध्यक्ष अय्युब नल्लामंदू यांच्या मार्गदर्शनाखाली गौसपाशा शेख, डॉ. विलास काळे, डॉ. ज्ञानेश्वर गोरे आदी लेखकांच्या कथा सादर होतील. सूत्रसंचालन प्रा. सुरैय्या जहागीरदार करणार आहेत. त्यानंतर ‘मुस्लिमांचे शिक्षण – आरक्षण व प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावर परिसंवाद होईल, ज्याचे अध्यक्षस्थान नौशाद उस्मान भूषवणार आहेत. पुढील सत्रात ‘अल्पसंख्याकांवरील सांस्कृतिक-आर्थिक हल्ले आणि लोकशाही’ या विषयावर डॉ. अस्लम बारी, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, आणि प्रा. रामटेके आपले विचार मांडतील.

दुपारी होणारे ‘सावित्री – फातिमाबीच्या लेकींचे कवीसंमेलन’ हे विशेष आकर्षण ठरणार आहे. अध्यक्षस्थानी तहसीन सय्यद असतील. डॉ. अर्जिनबी शेख, मीना मोहन भागवत, निलोफर फणीबंद, रजिया डबीर, सारिका देशमुख, नेहा गोडघाटे यांच्यासह अनेक महिला कवी आपली सशक्त कविता सादर करतील. दुपारी ४ वाजता होणाऱ्या समारोप सत्रात अध्यक्षस्थानी पुन्हा डॉ. एस.एन. पठाण असतील. माजी खासदार हुसेन दलवाई, अॅड. अभिजीत वंजारी, प्रा. रणजीत मेश्राम, डॉ. आय. जी. पठाण यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. प्रास्ताविक डॉ. तांबोळी, ठराव वाचन हासीब नदाफ आणि आभार अय्युब नल्लामंदू करतील.

हे संमेलन म्हणजे मुस्लिम मराठी साहित्यिकांचा आत्मप्रत्यय, भाषिक समरसतेचा उत्सव आणि सांस्कृतिक वैविध्याची साजरीकरण ठरणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि स्त्रीवादी विषयांना साहित्याच्या माध्यमातून स्पर्श करत हे संमेलन विवेकशील संवाद उभारेल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे. नागपूरमध्ये होणारे हे संमेलन साहित्यप्रेमींना दीर्घकाळ प्रेरणा देणारे ठरेल.

Protected Content