छत्तीसगढ (वृत्तसंस्था) छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. एसपी मोहित गर्ग यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल टास्क फोर्स आणि डिस्ट्रीक्ट रिझर्व गार्ड्सच्या जवानांनी ही कामगिरी बजावली आहे.
बीजापूर येथील जंगलात नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण तळ असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. गुरुवारी सकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत १० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. घटनास्थळावरुन शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये एक स्थानिक महिला ठार झाली होती. त्यानंतर बीजापूरमध्ये काही नक्षलवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. गुरुवारी सकाळी गर्ग यांच्या टीमने नक्षलवाद्यांना सर्व बाजूंनी घेरले. काही तासांच्या चकमकीनंतर सुरक्षा यंत्रणांनी १० नक्षलवाद्यांचा खात्मा केला. नक्षलवाद्यांची ११ अत्याधुनिक हत्यारंही जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीत एकही जवान जखमी झाला नसून इतर नक्षलवाद्यांचा तपास सुरू आहे.