८ वर्षानंतर भारत , पाकिस्तान क्रिकेट सामान्यांची शक्यता

 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था । भारत आणि पाकिस्तान यावर्षी 3 सामन्यांची टी -20 मालिका खेळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाले तर 8 वर्षांनंतर दोन्ही संघ द्विपक्षीय मालिकेत खेळतील.

 

उभय संघांमधील शेवटची टी -20 आणि एकदिवसीय मालिका डिसेंबर 2012 मध्ये खेळवली गेली होती. 2012 मधली टी -20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका पाकिस्तानने 2-1 ने जिंकली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांना उभय संघांमधील मालिकेसाठी तयारी करण्यास सांगितले आहे.

 

पुढील आठवड्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत यावर चर्चा होऊ शकते,  भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 30 मार्चला भारतीय परराष्ट्रमंत्री आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री यांची भेट होण्याची शक्यता आहे. यावेळी, दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय क्रिकेट मालिकेस सहमती दर्शविली जाऊ शकते.

 

यावर्षी दोन्ही देशांमधील स्पर्धा शक्य आहे. दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची टी -20 मालिका खेळवली जाऊ शकते आणि त्यासाठी 6 दिवसांच्या विंडोचा (दोन्ही देशांच्या ठरलेल्या आगामी वेळापत्रकामध्ये तीन सामने खेळवता येतील यासाठी 6 दिवसांचा कालावधी) शोध सुरू आहे.

 

 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळवण्याचे निश्चित झाल्यास भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर  जाईल ,  2012-13 मध्ये दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता.

 

पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी  म्हणाले की, या मालिकेसंदर्भात अद्याप कोणीही त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ  काही बोलले नाही.

 

इंग्लंडविरुद्ध टी -20 मालिकेतील पाचव्या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आणखी काही टी -20 मालिकांचा उल्लेख केला होता. विराट म्हणाला होता की, टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी आणखी काही टी-20 मालिकांच्या आयोजनाबद्दल क्रिकेट बोर्ड विचार करत असल्याचे त्याने सांगितले होते.

 

सध्या टीम इंडियाचे वेळापत्रक खूप टाईट आहे. आयपीएलचे 14 वे सत्र 9 एप्रिलपासून खेळवले जाणार आहे. ही स्पर्धा 30 मे रोजी संपेल. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध 18 ते 22 जून दरम्यान आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी टीम इंडियाला इंग्लंडला जावे लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाला बिझी शेड्यूलमधून वेळ काढावा लागणार आहे.

 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर जुलैमध्ये भारताकडे एक महिन्याचा मोकळा वेळ असेल. ही विंडो भारत-पाकिस्तान मालिकेसाठी वापरली जाऊ शकते. यानंतर भारताला ऑगस्टमध्ये इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिकादेखील खेळायची आहे.

 

ही मालिका 14 सप्टेंबर रोजी संपेल. इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर आणि ऑक्टोबरमध्ये विश्वचषक सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला जवळपास 1 महिना मिळेल . या विंडोचा वापर उभय देशांमध्ये टी -20 मालिका खेळवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

 

 

भारत आणि पाकिस्तानने 9 वर्षांपासून कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. 2007-08 च्या मालिकेनंतर दोन्ही देशांमध्ये कसोटी मालिका खेळवण्यात आलेली नाही. तथापि, दोन्ही संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरूद्ध खेळतात. या दोघांमधील शेवटचा टी – 20 सामना 19 मार्च 2016 रोजी खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 6 गडी राखून पराभूत केले होते.

Protected Content