८४ देशांना कोरोना लसींच्या ६ कोटी ४५ लाख डोसची निर्यात

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आत्तापर्यंत भारताकडून कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींचे ६ कोटी ४५ लाख डोस इतर देशांना निर्यात करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकूण ८४ देशांचा समावेश आहे.

 

काही दिवसांपासून करोना लसीच्या डोसचा तुटवडा चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांनी लसीचे पुरेसे डोस केंद्राकडून येत नसल्याची तक्रार देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर देशात नेमकं किती लसीकरण झालंय? डोस खरंच कमी पडले आहेत का? याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नांना आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी उत्तर दिलं  देशात आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणाची आकडेवारी त्यांनी मांडली आहे.गेल्या २ महिन्यांत देशात मोठ्या प्रमाणावर  रुग्ण वाढले असून लोकांचं बेजबाबदार वर्तन त्याला कारणीभूत ठरल्याचं देखील आरोग्यमंत्री म्हणाले आहेत. त्यांनी सादर केलेल्या आकडेवारीमध्ये आत्तापर्यंत दिलेले डोस, कुणाला किती डोस मिळाले, किती आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण झालं आहे याविषयी माहिती देण्यात आली आहे.

 

“गेल्या आठवड्यात भारतात एकाच दिवशी तब्बल ४३ लाख लोकांना लस देण्यात आली. जगभरात एकाच दिवशी झालेल्या लसीकरणाचा हा सर्वाधिक आकडा असेल”, असं आरोग्यमंत्री म्हणाले. “गेल्या २४ तासांमध्ये देशात ३६ लाख ९१ हजार ५११ लोकांना लसीकरण करण्यात आलं आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

 

देशातील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना झालेल्या लसीकरणाची देखील माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी यावेळी दिली. “८९ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. ५४ लाख कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मिळाला आहे. ९८ लाख फ्रंटलाईन वर्कर्सला पहिला तर ४५ लाख फ्रंटलाईन वर्कर्सला दुसरा डोस मिळाला आहे”, असं डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितलं.

 

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, आत्तापर्यंत देशात ४५ ते ५९ या वयोगटातल्या २ कोटी ६१ लाख लोकांना पहिला तर ५ लाख २३ हजार २६८ लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. ६० पेक्षा जास्त वयाच्या ३ कोटी ७५ लाख लोकांना पहिला तर १३ लाख लोकांना दुसरा डोस मिळाला आहे.

 

लसींचा तुटवडा जाणवू लागल्याची तक्रार काही राज्यांकडून केली जात आहे. त्यासोबतच देशात लसींचा पुरवठा अपुरा असताना केंद्र सरकार परदेशात लसीचे डोस निर्यात करत असल्याची टीका देखील करण्यात आली. त्यावर आत्तापर्यंत परदेशात किती डोस निर्यात झाले, याचीही आकडेवारी आरोग्यमंत्र्यांनी सादर केली.

 

भारताची  चाचण्या करण्याची क्षमता गेल्या काही महिन्यांमध्ये किती प्रमाणात वाढली, याची देखील आकडेवारी हर्ष वर्धन यांनी दिली. “आपल्याकडे आजच्या घडीला दिवसाला १३ लाख लोकांची  चाचणी करण्याची क्षमता आहे.   चाचणी करणाऱ्या एका प्रयोगशाळेपासून सुरू झालेला हा प्रवास होता. आत्तापर्यंत आपल्याकडे २४४९ लॅब तयार झाल्या आहेत. त्याच आधारावर आत्तापर्यंत भारतात २५ कोटी ७१ लाख ९८ हजार चाचण्या झाल्या आहेत. गेल्या २४ तासातच आपण १३ लाख ६४ हजार चाचण्या केल्या आहेत”, असं ते म्हणाले.

Protected Content