६०० रुपयात बोगस कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट ; पोलिसांनी टोळी पकडली

 

पुणे : वृत्तसंस्था ।  शेजारील राज्यांनी महाराष्ट्रातून येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह चाचणी बंधनकारक केलेली आहे. मात्र, याचा फायदा घेत पुण्यात बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणारे रॅकेट कार्यरत झालं होतं. अखेर या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून २८  निगेटिव्ह रिपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.  दोन जण फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. पत्ताराम  देवासी आणि राकेशकुमार वैष्णव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांचे इतर दोन साथीदार अद्याप फरार  आहेत.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातून राजस्थानला जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना  निगेटिव्ह रिपोर्ट दिला गेला असल्याची माहिती पोलीस अधिकारी काटे यांना मिळाली. निगेटिव्ह रिपोर्ट हवा असल्यास ५००-६०० रुपये मोजावे लागत असल्याचे तपासातून पुढे आलं. दोन्ही आरोपी हे ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशी बसवून देण्याचं काम करत. तेव्हा तिथे परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह रिपोर्ट लागत असल्याने आरोपी केवळ ५००- ६०० रुपयांमध्ये रिपोर्ट देत असत. त्यांच्याकडे आढळलेले रिपोर्ट हे बावधन येथील लाईफनीटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड येथील असून, त्यांच्या निगेटिव्ह रिपोर्टवरूनच आरोपी इतर डॉक्टरांच्या बनावट सह्या करून रिपोर्ट बनवत असत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  बनावट निगेटिव्ह २८ रिपोर्ट पोलिसांनी हस्तगत केले आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

Protected Content