नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्र सरकारने ५० हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन बाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. अनेक ठिकाणी रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याच्या पार्श्वभूमीवर बाधितांवर उपाचारासाठी अत्यावश्यक असणाऱ्या मेडिकल ऑक्सिजनची आयात केली जाणार आहे. जेणेकरून ज्या राज्यांमध्ये या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे, तिथे पुरवठा करता येईल व ऑक्सिजनचा तुटवडा नष्ट करता येईल.
केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे की, ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजनसाठी प्रस्ताव मागवले जातील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तसेच परराष्ट्र मंत्रालयाला आयातीसाठी संभाव्य संसाधनं शोधण्याचे देखील निर्देश दिले गेले आहेत.
आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे की, या संबंधी ते आदेश काढू शकतात आणि यास गृह मंत्रालयाद्वारे अधिसूचित केले जाईल. आवश्यकता असणाऱ्या या १२ राज्यांमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानचा समावेश आहे.
दिल्लीत काल बैठकीत देशातील अनिवार्य मेडिकल साहित्य आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत चर्चा झाली. सध्या पीएम केअर्स फंड अंतर्गत देशातील १०० नव्या रूग्णालयांमध्ये त्यांचा स्वतःचा ऑक्सिजन प्लॉन्ट आहे.
महाराष्ट्रात स्थिती हाताबाहेर जात असल्याने राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. संसर्गाची साखळी तोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासोबतच राज्य सरकारसमोर अनेक मोठी आव्हानं आहेत. राज्यात रेमडेसिवीरचा तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.