जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । युवाशक्ती फाऊंडेशनअंतर्गत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाची स्थापना केली. यावेळी काव्यरत्नावील चौकातील मिरवणुकीत सहभागी प्रत्येक कार्यकत्याने अंगात ५० खोके व एकदम ओके असा संदेश असल्याचे टीशर्ट परिधान केल्याचे पहायला मिळाले. याव्दारे गणेशोत्सवाव्दारे सुध्दा युवासेनेने शिंदे गटाच्या आमदारांना डिवचले असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, युवाशक्ती फाउंडेशनच्या वतीने काव्यरत्नावली चौकात बाप्पाची स्थापना केली जाते. यंदाही प्रचंड जल्लोषात बाप्पाचे स्वागत करण्यात येवून युवाशक्ती फाउंडेशनच्या वतीने बाप्पाची स्थापना करण्यात आली. यादरम्यान शहरात काढण्यात आलेल्या बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत मोठ्या संख्येने युवाशक्ती फाउंडेशनचे कार्यकर्ते सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया हे युवासेनेचे विभागीय सचिव आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी ५० खोके व एकदम ओके यावरुन शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदारांवर टीका केली जात आहे. याच अनुषंगाने युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवातही शिंदे गटाचे आमदार यांना डिवचण्याची संधी सोडली नाही. आज बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी प्रत्येक कार्यकर्त्याने अंगात ५० खोके व एकदम ओके असलेला टीशर्ट परिधान केल्याचं पहायला मिळालं. यावेळी गणपती बाप्पा मोरया या जयघोषाबरोबरच ५० खोके एकदम ओके अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. या कार्यकर्त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. गणेशोत्सवाचे दहाही दिवस कार्यकर्त्यांच्या अंगात हा टीशर्ट राहणार असून याद्वारे युवासेना शिंदे गटाच्या आमदारांवर निशाना साधणार आहे.