भुसावळ प्रतिनिधी । गत आठवड्यात शहरात ४६ लाखांच्या खंडणी प्रकरणातील फिर्यादीनेच संबंधीत प्रकरणात एका महिलेचा प्लॉट परस्पर विकल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे हे खंडणी प्रकरण खरे की खोटे ? याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एका शेतकरी महिलेचा भूखंड दुसर्याच एका इसमास विकून भुसावळ येथील टोळीने त्या व्यक्तीकडून २७ लाख ५० हजार रुपये हडप केले आहे. हा प्रकार ते २० नोव्हेंबर २०१५ ते १४ डिसेंबर २०१९ दरम्यान पडला आहे. या फसवणुकीचा उलगडा झाल्यामुळे सात आरोपींविरुद्ध नागपूर जिल्ह्यातील नंदनवन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुसुम अण्णाजी नासरे (६६) ही शेतकरी वयोवृद्ध महिला काटोल तालुक्यातील खंडाळा खुर्द येथील रहिवासी आहे. त्यांनी नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत हरपुर मधील रमणा मारुती परिसरात पंधरा क्रमांकाचा भूखंड काही वर्षांपूर्वी विकत घेऊन ठेवला होता. त्यांचे इकडे येणे-जाणे होत नसल्यामुळे या टोळीने हेरून या भूखंडाचा व्यवहाराची व मालकीची माहिती काढली. कागदपत्रे यांच्या नावाने बनावट आधार कार्ड ही तयार केले. कुसुम नासरे नावाने भलत्याच महिलेस निबंधक कार्यालयात उभे करून आरोपींनी मोतीराम गिरनारे व शैलेश सातपुते या दोघांनी हा भूखंड स्वतःच्या नावाने करून घेतला. त्यानंतर या टोळीने महाल मधील प्रसन्ना दत्तात्रय टोकेकर यांना विक्रीसाठी दाखवला. व त्यांच्याशी सौदा करून २७ लाख ५० हजार रुपये किमतीत हा भूखंड टोकेकर यांना विकला. या फसवणूक प्रकरणात गिरनारे पिता पुत्रासह शैलेश किरण सातपुते , जयंत प्रभाकर झांबरे , केशव रामदास नेमाडे ( सर्व रा. भुसावळ ) तसेच भरत महादेव निकोडे यांच्यासह एक अनोळखी महिलेचा या टोळीत समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी कुसुम नासरे व नातेवाईक भूखंडावर गेले. मात्र त्यांना दुसर्याच नावाचा फलक दिसला . चौकशी केली असता ही बनवाबनवी दिसून आले. त्यामुळे त्यांनी नंदनवन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सोमवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीनी याचप्रकारे इतर भूखंड ही बनावट कागदपत्रे तयार करून विकले असावे , असा अंदाज नागपूर पोलिसांनी व्यक्त केला . एका आरोपीविरूद्ध राणाप्रताप नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे समजते. तर पाच आरोपी भुसावळ येथील आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोतीराम गणपत गिरनारे व भरत मोतीराम गिरनारे यांनी गेल्या आठवड्यात २२ फेब्रुवारी रोजी भुसावळ येथे भूखंडाच्या विक्रीतून शहरातील भाजपा नगरसेविका यांचे पती संजय आवटे, भुर्या बारसे, अनिल डागोर, किशोर उर्फ सुधाकर टोके ( सर्व रा. भुसावळ ) त्याचप्रमाणे रशीद ( पूर्ण नाव माहीत नाही ) व गुलाब ताज उर्फ गुड्डू दोन्ही रा. नागपूर यांच्याविरुद्ध ४६ लाख रुपये खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे . यातील तीन आरोपींना अटकही करण्यात आली होती. यातच आता गुन्हा दाखल करणार्या गिरनारे पिता-पुत्राविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.