दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसंस्था | ७१ व्या “मिस वर्ल्ड’-२०२३ स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आले असून याबाबतची घोषणा “मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन’ने नवी दिल्लीत केली आहे. यामुळे १३० हून अधिक देशातील स्पर्धक देशात दिसणार आहे.
“मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन’च्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जुलिया मोर्ली यावेळी म्हणाल्या की, ७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धेची अंतिम फेरी भारतात होणार आहे. हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. ३० वर्षांहूनही अधिक पूर्वी मी जेव्हा प्रथम भारताला भेट दिली. त्या क्षणापासून मला या अविश्वसनीय देशाबद्दल खूप जिव्हाळा वाटत आला आहे. तुमची अनन्यसाधारण व वैविध्यपूर्ण संस्कृती, जागतिक दर्जाची आकर्षणे आणि श्वास रोखून धरायला लावणारी ठिकाणे, उर्वरित जगाला कधी एकदा दाखवतो असे आम्हाला झाले आहे. एका असामान्य मिस वर्ल्ड फेस्टिवलची निर्मिती करण्यासाठी मिस वर्ल्ड लिमिटेड व पीएमई एण्टरटेन्मेंट एकत्र येत आहेत. ७१व्या मिस वर्ल्ड- २०२३ मध्ये, १३० राष्ट्रीय विजेत्यांचा एक महिन्यांचा ‘अविश्वसनीय भारतातील’ प्रवास दाखवला जाणार आहे. ७१वी आणि सर्वांत नेत्रदीपक अशी मिस वर्ल्ड अंतिम फेरी प्रस्तुत करताना आम्ही या प्रवासाचे दर्शन घडवणार आहोत.
७१वी मिस वर्ल्ड स्पर्धा (२०२३) सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून उदात्त कामांना उत्तेजन देणार आहे. स्पर्धकांना त्यांच्या समुदायांवर सकारात्मक प्रभाव टाकण्यास तसेच समाजासाठी योगदान देण्यास प्रेरणा देणार आहे. ऐश्वर्या राय-बच्चन, प्रियंका चोप्रा, युक्ता मुखी आदी बॉलिवूडमधील अभिनेत्रींसह अनेक भारतीय स्त्रियांनी हा जागतिक स्तरावरील सन्मान प्राप्त केला आहे. तत्पूर्वी ७१ वी मिस वर्ल्ड २०२३ ही स्पर्धा म्हणजे सौंदर्य, वैविध्य व सक्षमीकरणाचा गौरव करणारे एक असामान्य व्यासपीठ ठरणार आहे. १३०हून अधिक देशांतील स्पर्धक भारतात एकत्र येऊन त्यांच्या अनन्यसाधारण प्रतिभेचे, बुद्धिमत्तेचे व अनुकंपेचे दर्शन सर्वांना घडवणार आहेत. या स्पर्धक कठोर स्पर्धांच्या एका मालिकेत सहभागी होणार आहेत.