३०० जिल्हापरिषद शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यातील ३०० जिल्हापरिषद शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. या शाळांचा शैक्षणिक, भौतिक विकास करण्यात येणार आहे.

राज्याच्या अर्थसंल्पीय अधिवेशनात राज्यातील ३०० शाळा आदर्श शाळा म्हणून निवडण्याची घोषणा करण्यात आली होती. यानुसार प्रत्येक तालुक्यातील एक अशा ३०० शाळांची निवड करण्यात आली आहे. या निवडलेल्या शाळा पहिली ते सातवीच्या असून त्यांना आठवीचे वर्ग जोडण्यात येणार आहेत. या शाळांचा विविध स्तरावर विकास केला जाणार आहे. यात भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, आयसीटी आणि विज्ञान प्रयोगशाळा यांचा समावेश असणार आहे.

शैक्षणिक सुविधांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या चौकटी बाहेरील शिक्षण दिले जाणार आहे. यात वाचनावर विशेष भर देण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा व गणित विषयातील मुलभूत संकल्पना शिकविल्या जाणार आहेत. पूरक शिक्षण देणारी पुस्तके, विश्वकोष उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना नेतृत्व गुणांचे कौशल्यही शिकविले जाणार आहे.

दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरेल असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईतील अनुदानित शाळांचाही यामध्ये समावेश करावा अशी मागणी आहे. तसे झाल्यास मुंबईतील विद्यार्थ्यांनाही फायदा होईल

या शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती ही ज्यांना काम करायची इच्छा आहे त्यांची योग्य निवडपद्धतीने केली जाणार आहे. शिक्षकांना पाच वर्षे कालावधीसाठी या शाळेत सेवा देता येणार आहे तर पाच वर्षे त्यांना बदलीची विनंती करता येणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Protected Content