कोल्हापूर वृत्तसंस्था । कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील दोन मंत्री, दोन खासदार यांच्यासह १४ आमदारांना करोनाने दणका दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यातील अनेकांनी करोनावर मात केली असून काही लोकप्रतिनिधी अजूनही उपचार घेत आहेत.
मुंबई आणि पुणे पाठोपाठ कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत दोन महिन्यांत संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ३५ हजार, सांगलीत २५ हजार तर साताऱ्यातही २१ हजारावर बाधित आढळले आहेत. या तीन जिल्ह्यांत आतापर्यंत अडीच हजारावर लोकांचा या विषाणूने बळी घेतला आहे. उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यासह आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन व लोकप्रतिनिधीही हतबल झाले आहेत.
लोकांशी रोज येणारा संपर्क आणि इतर काही कारणामुळे अनेक आमदारांना त्याची बाधा झाली. पालकमंत्री जयंत पाटील आणि आमदार मानसिंग नाईक वगळता इतर नऊ आमदारांना संसर्ग झाला आहे. यावर सर्व आमदारांनी मात केली. सध्या राज्यमंत्री विश्वजीत कदम उपचार घेत आहेत. त्यांचे काका आमदार मोहनराव कदम यांनी वयाच्या ८५व्या वर्षीही करोनावर मात केली. आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुमन पाटील, अनिल बाबर, विक्रम सावंत, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांनी या आजारावर विजय मिळवला. खासदार संजय पाटील यांनी या आजाराला परतवून लावले. या जिल्ह्यातील माजी महापौर हारुण शिकलगार यांचा मात्र मृत्यू झाला.
कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार प्रा. संजय मंडलिक बाधित असून ते घरीच उपचार घेत आहेत. आमदार प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांनी त्यावर मात केली. आवाडे यांच्या कुटुंबातील २२ पैकी १८ जणांना लागण झाली होती. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी लढाई जिंकली. पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि आमदार मकरंद पाटील हेदेखील उपचारानंतर बरे झाले. राजकीय व्यक्तींचा दिवसभर विविध क्षेत्रातील लोकांशी संपर्क येतो. बैठका आणि भेटीगाठी यातून त्याचा अधिकाऱ्यांनाही फटका बसत आहे. तीन जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांना याचा फटका बसला, पण सर्वांनी त्यावर मात केली. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींना दणका बसत असल्यामुळे सध्या राजकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण आहे.