१५ जुलैपासून ग्रामीण भागात शाळा उघडणार

 

मुंबई :  वृत्तसंस्था । ज्या गावांमध्ये एक महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. गावं कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीने केला असेल, अशा गावात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्यास मंजुरी दिली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

 

राज्यातील शेवटच्या घटकातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी मिश्रित शिक्षणाचा दृष्टिकोन बाळगणे ही काळाची गरज बनली आहे.ही बाब लक्षात घेऊन दूरस्थ शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाला चालना देण्यासोबतच कोरोनामुक्त ग्रामीण भागांत कोरोना प्रतिबंधकतेची संपूर्ण खबरदारी घेऊन शाळा सुरु करीत आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

 

 

पुढील काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर राज्य सरकार आणि शिक्षण विभागाचं पूर्ण लक्ष असेल. ज्या गावात एक महिन्यापासून एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. तसंच ज्या गावातील सरपंच, तलाठी, वैद्यकीय अधिकारी आणि शालेय शिक्षण समिती या सर्वांनी मिळून गाव कोरोनामुक्त राखण्याचा ठराव सर्वानुमते केलाय, अशा गावात 15 जुलैपासून शाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिलीय. त्याचबरोबर शाळा सुरु करण्यासाठी राज्य सरकारनं काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. तसंच पालकांनीही मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय.

 

 

 

कोरोना संकटाच्या काळात ग्रामीण भागात दूरस्थ शिक्षण आणि ऑनलाईन माध्यमाद्वारे मुलांना शिक्षण दिलं जात होतं. पण अनेक भागात इंटरनेट आणि इलेक्ट्रिसिटीची अडचण निर्माण होत होती. त्यामुळे अशा गावांमधील कोरोनाचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिलीय.

 

Protected Content