रावेर : प्रतिनिधी | लग्नासाठी १० लाख रुपये हुंड्याची मागणी करत , झालेला साखरपुडा मोडून लग्नास नकार देणाऱ्या मुंबई येथील चौघांसह वरपक्षाकडील पाच जणांविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला .
विश्रामजिन्सी येथील चरणसिंग पवार यांच्या मुलीचा कल्याण येथील सुदर्शन चव्हाण याच्याशी ३ नोव्हेंबर २०१ ९ रोजी साखरपुडा झाला होता . त्यावेळी लग्नाची तारीख ठरवली होती . मात्र त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने लग्न होऊ शकले नाही .
त्यानंतर मुलीच्या वडिलांनी सुदर्शन चव्हाण , भालचंद्र चव्हाण , रितेश चव्हाण , अनिता चव्हाण ( सर्व रा.सुंदर कॉम्प्लेक्स , गौरीपाडा , कल्याणपश्चिम , जि.ठाणे ) व नामोबाई राठोड ( रा.मालेगाव रोड , चाळीसगाव ) यांच्याशी वारंवार फोनवरून संपर्क साधून लग्नाची तारीख ठरवण्याबाबत विचारणा केली . त्यावेळी त्यांनी १० लाख रुपये हुंडा द्या , तरच आम्ही तुमच्या मुलीशी लग्न करू असे सांगितले . हुंडा न दिल्याने झालेला साखरपुडा मोडून टाकला .
साखरपुड्यात सुदर्शन चव्हाण याला दिलेले २५ ग्रॅम सोने व साखरपुड्याचा २ लाख ५६ हजार रुपये खर्च परत करावा , अशी मागणी मुलीच्या वडिलांनी चव्हाण कुटुंबियांकडे केली . मात्र सोने व खर्च परत देणार नाही असे म्हणत चव्हाण कुटुंबाने चरणसिंग पवार यांना शिवीगाळ केली . चव्हाण कुटुंबाने फसवणूक केल्याने मुलीचे वडील चरणसिंग पवार यांनी या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला