होय…मेगा भरतीमुळे भाजपचे मोठे नुकसान झालेय- नाथाभाऊंचा आरोप (व्हिडीओ)

eknath khadse

जळगाव प्रतिनिधी । पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरात सुर मिळवत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मेगा भरतीमुळे भाजपचे मोठे नुकसान झाले असल्याचे वक्तव्य केले. ते आज त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज त्यांच्या जळगावातील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पीक विम्यातील घोळाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यातील शेतकर्‍यांनी ३० ऑक्टोबर २०१९ पर्यंत विम्याचा हप्ता भरून टाकला. तर लागलीच दुसर्‍याच दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी विम्याचे निकष बदलण्यात आलेत. यात पेरू आणि लिंबू या राज्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणार्‍या फळांना विम्यातून वगळण्यात आले आहे. तर केळीसह अन्य पीकांसाठी कमाल आणि किमान तापमानाच्या निकषांमध्येही बदल करण्यात आले असून यामुळे राज्यातील बहुतांश शेतकर्‍यांना लाभ मिळणार नसल्याची बाब उघड आहे. यामुळे राज्य सरकारने आधीचेच निकष लावण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांना केली आहे. या संदर्भात आपण या दोन्ही मान्यवरांना पत्र लिहले असून आधीचे निकष लावण्यासाठी भेट घेणार असल्याची मागणीदेखील त्यांनी केली.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कालच मेगा भरतीमुळे भाजपचे नुकसान झाले असल्याचे वक्तव्य केले असून याकडे लक्ष वेधले असता नाथाभाऊंनी याला दुजोरा दिला. ते म्हणाले की, भाजपमधील मेगा भरतीला विरोध आपण सर्वप्रथम केला होता. आम्ही ज्यांच्यावर आरोप केले. त्यांनाच पक्षात घेऊन मंत्रीपदे दिल्याचा मोठा फटका पक्षाला बसला. यामुळे भाजपचे सरकार सत्तेवरून पायउतार झाल्याचेही खडसे म्हणाले.

पहा : एकनाथराव खडसे नेमके काय म्हणालेत ते ?

Protected Content