नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारत व चीनची शनिवारी लष्करी पातळीवरील दहाव्या फेरीची चर्चा सुरू झाली हॉट स्प्रिंग्ज, गोग्रा, देपसांग, या पूर्व लडाख भागातील माघारीबाबत यात विचार करण्यात येणार आहे. तणाव कमी करण्यासाठी या चर्चेचा लाभ होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दहाव्या कोअर कमांडर पातळीवरील चर्चा ही भारत व चीन यांच्या लष्करादरम्यान पँगाँग सरोवराच्या उत्तर व दक्षिण बाजूकडील सैन्य माघारीनंतर घेण्यात आली. त्यात सैन्य माघारीबरोबरच शस्त्रसामग्री व तंबूही काढण्यात आले.
चर्चेची दहावी फेरी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हद्दीतील मोल्दो येथे सुरू झाली. हॉट स्प्रिंग, गोग्रा व देपसांग भागातून लवकर माघारीचा भारताचा आग्रह असून त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव निवळण्यास मदत होणार आहे. चर्चेचा भर हा सैन्य माघारीवरच आहे
११ फेब्रुवारीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत जाहीर केले होते, की भारत-चीन यांच्यात पँगॉग सरोवराच्या उत्तर व दक्षिण भागातून सैन्य माघारीचा करार झाला असून दोन्ही देशांनी आघाडीच्या छावण्यातील सैन्य टप्प्याटप्प्याने माघारी घेण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर आठ भागापर्यंत चिनी सैन्य माघारी जाणे अपेक्षित आहे.
भारतीय सैन्य धनसिंह थापा छावणीजवळील फिंगर ३ पर्यंत असणे अपेक्षित आहे. दक्षिण किनारा भागातही याच पद्धतीने माघारीची अपेक्षा आहे, त्याप्रमाणे ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले होते. १० फेब्रुवारीला सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. शनिवारी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व लेह विभागातील १४ व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी केले तर चीनच्या बाजूने दक्षिण शिनजियांग लष्करी जिल्ह्यातील पीपल्स लिबरेशन आर्मीचे कमांडर मेजर जनरल लिउ लिन यांनी नेतृत्व केले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी असे सांगितले होते, की पँगॉग सरोवरानजीकचे सैन्य माघारी घेतल्यानंतर ४८ तासांत चर्चेची पुढची फेरी घेतली जाईल. त्याप्रमाणे ही चर्चा घेण्यात आली. गेल्या वर्षी ५ मे रोजी भारतीय व चिनी लष्करात हिंसक चकमकी सुरू झाल्या होत्या, त्यामुळे दोन्ही देशांनी हजारो सैनिक व अवजड शस्त्रे सीमेवर तैनात केली होती. गेल्या वर्षी चीनने अनेक बंकर्सही उभारले होते. ते पँगॉग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर फिंगर ४ व फिंगर ८ या भागात होते. दक्षिण भागातील शिखरांवरून भारतीय सैन्याने माघार घ्यावी, असे चीनचे म्हणणे होते. पाच महिन्यांपूर्वी भारतीय सैन्याने मुखपारी, रेशीन ला, मगर हिल या दक्षिण किनारी भागात तैनाती केली होती.