जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आकाशवाणी चौकातील हॉटेलमधील कॅश काऊंटरचे कुलूप तोडून मुद्देमाल लांबविण्याच्या तयारी असलेल्या दोन चोरट्यांना हॉटेलमधील कर्मचार्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून मॅनेजरचा चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील आकाशवाणी चौकातील हॉटेल मुरलीमनोहर येथे मॅनेजर म्हणून हिरालाल तेजपाल उपाध्याय हे नोकरीला आहे. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांनी हॉटेल बंद करुन ते रुपकिशोर चौधरी व धिरज रावत या कारागिरांसोबत हॉटेलमध्येच झोपले होते. यावेळी त्यांनी आपला मोबाईल त्यांच्या उषाशी ठेवला होता. मध्यरात्रीच्या सुमारास कारागिर धिरज रावत हा पाणी पिण्यासाठी उठला असता, त्याला हॉटेलच्या काऊंटरवर दोन अनोळखी इसम काऊंटरचे लॉक उघडत असल्याचे दिसले. त्यांनी लागलीच झोपलेल्या मॅनेजरसह आपल्या सहकार्यांना याचीमाहिती दिली. त्या दोघ चोरट्यांना चाहूल लागताच ते दोघ पळून जात असतांना हॉटेलच्या मॅनेजरसह दोघांनी त्यांना रंगेहाथ पकडले आणि घटनेची माहिती हॉटेलचे मालक लेखराज उपाध्याय यांना दिली. त्यांनी लागलीच हॉटेलमध्ये धाव घेत डायल ११२ वर संपर्क साधून घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेले रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्याठिकाणी आले. त्यांनी त्या दोघ चोरट्यांची अंगडझडती घेतली असता एकाच्या खिशात मॅनेजरचा चोरलेला मोबाईल तर दुसर्याच्या खिशात वायर कटर आढळून आले. पोलिसांनी दोघ चोरट्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव आकाश श्रीकृष्ण जंजाळे (वय-२३, रा. समता नगर बौद्ध वाडा) व प्रदीप धनराज पवार (वय-१९, रा. संतोष आप्पा नगर, वाघनगर) असे सांगितले. त्यांनी आपली दुचाकी हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या गेटजवळ लावून हॉटेची संरक्षक भिंतीवरुन उडी मारुन हॉटेलमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी दोघ चोरट्यांना पोलीस ठाण्यात आणून त्या दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.