जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचे संशयित म्हणून दाखल करण्यात आलेले दोन रूग्ण रात्री उशीरा जिल्हा रूग्णालयात मृत झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र आज या दोघांचे रिपोर्ट कोरोना निगेटीव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणांचा जीव भांड्यात पडला आहे.
याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच एका कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. यानंतर जिल्हा रूग्णालयात दोन रूग्ण दाखल झाले होते. त्यांचे सँपल घेण्यात आले असले तरी त्यांचा रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. या पार्श्वभूमिवर, रात्री उशीरा दोन्ही रूग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे महाधिष्ठाता डॉ. भास्कर खैर यांनी रूग्णालयात दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना संशयित म्हणून दाखल केले होते या माहितीला दुजोरा दिला. तथापि, या दोघांचे स्वॅप सँपल पाठविण्यात आले असून याचा रिपोर्ट येणे बाकी असल्याचे याबाबत आजच विधान करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमिवर, आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास या दोन्ही रूग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला. यात चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने हे दोन्ही रूग्ण कोरोनाच्या संसर्गामुळे न दगावल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील एक रूग्ण ही ६५ वर्षांची महिला होती. तिचा मृत्यू उच्च रक्तदाबाने झाला आहे. तर दुसरा ३३ वर्षे वयाचा रूग्ण हा अल्कोहोलीक सिंड्रोममुळे मृत्युमुखी पडल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दोन्ही रूग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणांचा जीव भांड्यात पडला आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००