हिवाळ्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतात !

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हिवाळा संपल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी हिवाळ्यात मागणी वाढत असल्याने इंधनाचे दर वाढत असल्याचं वक्तव्य केलं आहे.

“आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढत असल्याचा फटका ग्राहकांनाही बसला आहे. हिवाळा गेल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असून, मागणी जास्त असल्याने दर वाढले आहेत. थंडीत हे होत असतं, दर कमी होतील,” असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.

शुक्रवारी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलीटर ९० रुपये ९३ पैसे तर डिझेलचा दर ८१ रुपये ३१ पैसे इतका झाला आहे. तर मुंबईत हा पेट्रोलचा दर ९७ रुपये ३४ पैसे आणि डिझेलचा दर ८८ रुपये ४४ पैशांवर पोहोचला आहे.

दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी इंधन दरवाढीसंदर्भात भाष्य केलं. पेट्रोल डिझेलच्या किंमती कधी कमी होतील हे सांगता येणार नाही असं सीतारामन यांनी म्हटलं.पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती या धर्मसंकट असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती कधी कमी होणार यासंदर्भातील प्रश्नावर, “मला नाही सांगता येणार ‘कधी’.. हे धर्मसंकट आहे,” असं उत्तर दिलं.

“यावर केवळ उपकर आकारला जातो असं नाही. केंद्राकडून आकरले जाणारे उत्पादन शुल्क तसेच राज्यांकडून आकारला जाणारा व्हॅटही यामध्ये असतो. त्यामुळे यामधून महसूल मिळतो ही काही लपवण्यासारखी गोष्ट नाही. केवळ मलाच नाही तुम्ही कोणत्याही राज्याला विचारलं तरी यात महसूल आहे असं ते सांगतील,” असंही निर्मला यांनी म्हटलं. इंधन दरवाढीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करावी हा एकमेव उपाय असल्याचं त्यांनी सांगितलं.

पेट्रोलियम निर्यातक देशांची संघटना आणि रशियासह त्यांचे सहयोगी देश मिळून होणारा ‘ओपेक प्लस’ हा गट यांच्यात झालेल्या करारानुसार सौदी अरेबियाने फेब्रुवारी व मार्च महिन्यात तेलाचे उत्पादन दररोज १ दशलक्ष बॅरेलने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हापासून तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती सतत वाढत आहेत. यामुळे तेलाच्या किमती बॅरलमागे ६३ अमेरिकी डॉलपर्यंत चढल्या आहेत. यामुळेच इंधनाचे दर भडकले आहेत.

Protected Content