मुंबई प्रतिनिधी| हिंदुत्ववाद्यांचे सरकार आले. मात्र हिंदुत्व उघडे बोडके झाले असा आरोप करत आज शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सामनातल्या विशेष संपादकीयमधून ही टीका करण्यात आली आहे.
आजच्या सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे की, हिंदुत्वच देशाला तारेल हा शिवसेनाप्रमुखांचा विचार. त्याच हिंदुत्वाने भाजपसारख्या पक्षांना दिल्लीच्या सिंहासनावर विराजमान केले. पण सिंहासनावर बसताच सिंहाची आयाळ झडू लागली व हिंदुत्व उघडे बोडके झाले. आता तर हिंदुत्वाचे मुसळ हिंदुत्ववाद्यांनीच केरात टाकले. अशा वेळी बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्व आम्हाला मार्ग दाखवते. देशाला दिशा नाही व विचारांची दशा झाली. कोणत्याही सर्जिकल स्ट्राइकशिवाय अमरनाथ यात्रेवर हल्ला करणार्या अतिरेक्यांना दे माय धरणी ठाय करून सोडणारे एकमेव शिवसेनाप्रमुखच होते. त्यांच्या शब्दांत धार होती. विचारांत आग होती. चालण्यात सिंहाचा डौल होता. त्यांनी लोकांना आत्मविश्वास दिला व मनगटात निखारे पेरले. त्यांनी सत्तेचा सारीपाट मांडला नाही. बुद्धिबळाची प्यादी हलवली नाहीत. ते सरळसोट होते. त्यांनी लपवाछपवीचा खेळ केला नाही. कारण विचार आणि कृतीत भेसळ नव्हती. या देशात मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती होणे कठीण नाही, पण बाळासाहेब ठाकरे फक्त जन्मावे लागतात
या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, मशतके बदलतील, पिढ्या बदलतील, पण बाळासाहेबांचा जन्मदिवस साजरा होत राहील. यालाच अमरत्व म्हणतात. हे अमरत्व बाळासाहेब जन्मतःच सोबत घेऊन आले. बाळासाहेबांचा जन्म हा एका तेजाचा जन्म होता. म्हणून तेज घेऊन शिवसेना आजही उभी आहे. शिवसेना संपविण्याचा विडा उचलून महाराष्ट्रात अनेक अफजलखान आले व उताणे पडले. शिवसेनेला राजकीय मैदानात पटकण्याची पोकळ डरकाळी फोडणारेही काळाच्या ओघात नष्ट झाले. शिवसेना ही लेच्यापेच्यांची संघटना नाही अशा शब्दात भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.