नागपूर । हिंगणघाट जळीत प्रकरणातला आरोपी विकेश नगराळे याने नागपूर कारागृहात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त असून यामुळे खळबळ उडाली आहे.
हिंगणघाट येथील प्रकरणाने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदोरी चौकात विकेश नगराळे याने एका युवतीवर पेट्रोल टाकून तिला जाळले होते. उपचारादरम्यान तिचा नागपुरातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला अटक केली. तो सध्या नागपूरमधल्या तुरुंगात आहे. त्याने कारागृहात गळफास लाऊन घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्याला कारागृहातील विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले असून तेथील ब्लँकेटच्या मदतीने त्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.