हाथरस: वृत्तसंस्था । पीडित कुटुंबाला प्रसारमाध्यमांशी बोलायचे आहे, मात्र त्यांना घरामध्येच कैद करून ठेवण्यात आले आहे. सर्वांचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर माझ्या काकांच्या छातीवर जिल्हाधिकाऱ्याने लाथ देखील मारली, असे गंभीर आरोप या कुटुंबातील मुलाने केले आहेत.
हाथरस सामूहिक बलात्कार गुन्हा हाताळण्यात प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पीडितेच्या गावाला पोलिसांनी सर्व बाजूंना घेरले आहे. कोणालाही गावातून बाहेर जाण्याची आणि बाहेरून गावात येण्याची परवानगी नाही. पोलिसांना चकवा देत लपून गावाबाहेर येत गावातील मुलाने पोलिस आणि प्रशानावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
पोलिसांची नजर चुकवून शेतातून पळत आलेल्या या मुलाने माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. मला माझ्या कुटुंबीयांनी बाहेर पाठवले आहे. प्रसारमाध्यमांना इकडे घेऊन ये, आम्हाला त्यांच्याशी बोलायचे आहे असे त्यांनी मला सांगिल्याचे मुलाने सांगितले. कोणालाही घराबाहेर पडू दिले जात नसल्याचेही मुलगा म्हणाला.
‘पोलिसांनी आमच्या घराला घेरले असल्याचे या मुलाने पत्रकारांना सांगितले. गाव, गल्ल्या आणि घरांमध्ये, घराबाहेर आणि घरांच्या छतांवर देखील पोलिस असल्याचे मुलाने सांगितले. कोणालाही बाहेर पडू दिले जात नाही. माध्यमांशी बोलण्याची बंदी घालण्यात आलेली आहे, अशी माहिती मुलाने दिली.
घरात असलेल्या सर्वांचे फोन हिसकावून घेण्यात आल्याची माहितीही या मुलाने दिली. आता कोणाकडेही फोन नाही. प्रत्येकाचे फोन काढून घेतल्यानंतर सर्वांना एका खोलीत बंद करण्यात आले आहे. सर्वजण घाबरलेले असून त्रस्त आहे मात्र त्यांचे कोणीही ऐकून घ्यायला तयार नाही, अशी तक्रारही मुलाने केली.
या मुलाने आणखी गंभीर आरोप केले. आमच्याकडे जिल्हाधिकारी आले होते. त्यांनी माझ्या काकांच्या छातीत लाथ मारली. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. त्यांची तब्येत बरी नाही. मी लपून शेतांमधून येथपर्यंत आलो आहे. काका म्हणाले की पत्रकारांशी बोलायचे आहे, त्यांना बोलावून आण, अशी माहिती मुलाने दिली.