हाथरस : वृत्तसंस्था । हाथरस सामूहिक बलात्कार गुन्ह्यात पीडित कुटुंबीयांकडून पोलिसांवर करण्यात आलेल्या आरोपानंतर समाजाचा पोलिसांविरुद्धचा राग अनावर झालाय. यानंतर आज हाथरसमध्ये वाल्मिकी समाजाशी निगडीत ‘सफाई मजूर संघा’नं काम बंद आंदोलनाची हाक दिली. समाजातील काही लोकांनी हाथरसमध्ये रस्त्यावर पोलिसांवर दगडांचा वर्षाव केला. त्यानंतर पोलिसांकडून जनतेवर लाठीचार्ज करण्यात आला.
आक्रोश व्यक्त करताना हाथरसमध्ये दलित समाजातील लोकांनी शहरात बाजार बंद करण्यास भाग पाडलं. सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद करत आंदोलन पुकारलं. पोलिसांवर दगडफेक करतानाच एका बाईकला जाळण्याचाही प्रयत्न शहरात करण्यात आला. घटनास्थळी उपस्थित झालेल्या पोलीस दलानं समाजातील व्यक्तींवर लाठीचार्ज केला. त्यामुळे संपूर्ण हाथरस शहरात तणावपूर्ण वातावरण आहे.
पीडीत कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येतेय. यावेळी, आंदोलकांनी पोलीस प्रशासन मुर्दाबादचेही नारे दिले तालाब चौराहा सासनी गेटवर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली.
१९ वर्षांच्या पीडित दलित मुलीवर १४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चार हैवानांनी क्रूरपणे अत्याचार केले होते. पोलिसांवरही बेजबाबदारीचा आरोप करण्यात आलाय. सुरुवातील पोलिसांनी आरोपींवर छेडछाडीचा गुन्हा दाखल केला होता. परंतु, पोलिसांना कारवाई करणं भाग पडलं. बलात्कारानंतर १५ दिवसांनी मंगळवारी पहाटे या मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन न करता जबरदस्तीनं मुलीच्या मृतदेहावर रात्रीच अंत्यसंस्कार उरकले. मुलीचा मृतदेही तिच्या आई-वडिलांना घरी नेता आला नाही. पोलिसांनी जबरदस्तीनं सहमती पत्रावर स्वाक्षरी करून घेतली आणि अर्ध्या रात्री मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, असा आरोप मृत पीडितेच्या भावानं केल्यानंतर प्रकरण आणखीनच भडकलं.