जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात १०० फुटी रोडवर मंगळवार, २३ ऑगस्ट रोजी हातात पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
पराग राजेंद्र पाटील वय २१ रा. तेली चौक, साईबाबा मंदिराजवळ, शनिपेठ, जळगाव असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ३० हजार रुपये किंमतीची १ गावठी बनावटीची पिस्तूल जप्त करण्यात आली आहे.
कालिंका माता परिसरात १०० फुटी रोडवर पराग पाटील नावाचा तरुण हातात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अशोक महाजन, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, अविनाश देवरे यांच्या पथकाने बुधवार कारवाई करत संशयित पराग पाटील यास अटक केली, त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.