स्वाभिमानी शिक्षक संघटना करणार आयुक्तालयात आत्मक्‍लेश आंदोलन

 

पाचोरा, प्रतिनिधी । आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचार्‍यांच्या बाबतीत शासन नेहमीच सावत्रपणाची वागणूक देत असते असा आरोप स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष भरत पटेल यांनी केला आहे. यासंदर्भात नाशिक आयुक्तालयात आत्मक्लेश धरणे आंदोलन प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार असून, जिल्ह्यातून ४५० शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात सहभाग होणार असल्याचाही माहिती जिल्हाध्यक्ष संभाजी सिताराम पाटील यांनी दिली आहे.

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या मागण्या अवास्तव नसून शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणेच आहे. मात्र अनेक मागण्या आदिवासी आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यांना उशीरा लागू होतात अन्यथा काही लागू पण होत कळत नाही. यामुळे आदिवासी आश्रम शाळा कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे. जर सदर मागण्या आयुक्तालयात मंजूर झाल्या नाही तर २७ जानेवारीला मंत्रालयात सचिवांना घेराव घालण्यात येणार असल्याचेही भरत पटेल यांनी सांगितले आहे.

राज्यातील १ हजार ५५ शिक्षकांना सेवा सातत्य जरी दिले तरी त्यांचा फरक मिळालेला नाही. पहारेकरी यांना वेतन श्रेणी मिळाली नाही, ती मिळावी. वर्ग- ४ कर्मचाऱ्यांना तीन आश्वासित लाभांश योजनेचा लाभ मिळावा. अतिरिक्त तुकडीवरील कर्मचाऱ्यांना मान्यता देण्यात यावी. परिभाषित अंशदान योजनेचा कर्मचाऱ्यांना हिशोब द्यावा. प्रयोगशाळा परिचर कर्मचाऱ्याच्या वेतनातील तफावत दूर करावी. कनिष्ठ लिपिक यांना कामाप्रमाणे पगार मिळावा. काम नाही वेतन नाही हे धोरण रद्द करून काम मिळेपर्यंत पगार सुरू ठेवावा. एकाकी पदांना ग्रेड पे मिळावे. आदिवासी भागात अतिसंवेदनशील परिसरामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळावा. यासह विविध मागण्यांसाठी आत्मक्लेश आंदोलनाचे हत्यार स्वाभिमानी शिक्षक संघटनेने उपासले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असेही राज्याध्यक्ष भरत पटेल यांनी म्हटले आहे.

Protected Content