जळगाव, प्रतिनिधी – जिल्हाधिकार्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केलेले असतांना मनपा स्थायी समितीची सभा दि.२२ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. शहर रुग्ण वाढत असतांना सभा घेण्याचे प्रयोजन काय? सभेचा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयुक्तांना निवेदन देवून सभा रद्दची मागणीं करण्यात आली.
जळगाव शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतांना सभापती अॅड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा २२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सभापती स्वतः घरी रहा सुरक्षित रहा नागरिकांना आवाहन करीत आहेत. शहराची परिस्थिती पाहता सभापतींची सभा बोलाविण्याचे प्रयोजन काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच सभेत कोणाला कोरोनाची लागण झाल्यास त्यास स्थायी सभापती जबाबदार असतील असा इशारा देण्यात आला आहे. स्थायी समितीची सभा रद्द करावी या मागणीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. सभा रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. शिवसेनेतर्फे मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील,अॅड.कुणाल पवार,स्वप्नील नेमाडे,गणेश निंबाळकर यांनी निवेदन दिले. स्थायी समितीची सभा रद्द न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.