स्थायी सभा आरोग्याच्या प्रश्नांवर गाजली

जळगाव, प्रतिनिधी । मनपा स्थायी समितीची सभा विविध विषयांवर गाजली. यात प्रामुख्याने डेंग्यू, कुत्रे यांचा विषय गाजला.

 

सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त प्रशांत पाटील, संतोष वाहुळे, लेखा वित्त अधिकारी कपिल पवार, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.

नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी आरोग्य विभागाच्या गलथानपणा चव्हाट्यावर आणत प्रशासनाला खडे बोल सुनाविले. कोरोना काळात करार पद्धतीने घेण्यात आलेल्या कोरोना योद्ध्यांचे वेतन हे मनपा फंडातून करण्यात यावा असा प्रस्ताव प्रशासनाने सभागृहात मांडला होता. आपत्ती काळात साथ देणाऱ्या कोरोना योध्याचे वेतन मनपा फंडातून देण्यात येईल असे नितीन लढ्ढा यांनी सांगितले.

शहरात कुत्र्यांच्या वाढता हौदस बघता नंदुरबार येथील कंपनीला निर्बीजीकरणचे टेंडर देण्यात आले आहे. मात्र, त्यांनी कुठे कुत्र्यांना उचलले, कुठे सोडले याचा अहवाल दिलेला नसल्याने नगरसेवक दारकुंडे यांनी रोष व्यक्त केला. ज्या वार्डातून कुत्रे उचलून नेत आहेत त्याच वार्डात पुन्हा त्यांना सोडण्यात येत असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

शहरात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत असतांना मनपा प्रशासनाने कोणती उपाययोजना केली याची माहिती सदस्यांनी विचारली असता आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. ज्या परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत तेथेच फॉगिंग करण्यात येत असल्याचे उत्तर डॉ. पाटील यांनी दिले. शहरात किती घरांमध्ये आतापर्यंत  फॉगिंग करण्यात आली आहे याची विचारणा  जेष्ठ सदस्य नितीन लढ्ढा यांनी केली असता डॉ. पाटील यांनी १ लाख १६ हजार घरांमध्ये  फॉगिंग करण्यात आली असल्याची माहिती दिली. यावर श्री. लढ्ढा यांनी तुम्ही किती घरांना प्रत्यक्ष भेट दिली अशी विचारणा केली.याला उत्तर देतांना डॉ. पाटील यांनी आपण १०० घरांना भेटी दिल्याचे सांगितले.  यावर श्री. लढ्ढा यांनी नाराजी व्यक्त करत एका दिवसात एका वार्डात फॉगिंग करण्याच्या सूचना दिल्यात.  मनपाच्या छत्रपती शाहू महाराज दवाखान्यात काही कर्मचारी हे मेहंदी काढतांना आढळून आले होते. त्यांच्यावर काय कारवाई करण्यात अली याची विचारणा ज्योती चव्हाण यांनी डॉ. राम रावलानी यांना केली. याला उत्तर देतांना डॉ. रावलानी यांनी कर्मचाऱ्यांची बाजू घेत त्यांची  ड्युटी  संपली होती अशी माहिती दिली. यावर नितीन लढ्ढा यांनी आक्षेप घेत डॉ. रावलानी यांना चांगलेच धारेवर धरले.  आजच्या सभेत कुलभूषण पाटील, नितीन लढ्ढा, ज्योती चव्हाण, प्रतिभा देशमुख , नवनाथ दारकुंडे, प्रशांत नाईक या सदस्यांनी विविध विषयांवर चर्चेत भाग घेतला.

 

Protected Content