बारामती : वृत्तसंस्था । राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत स्वतंत्र लढावे की महाविकास आघाडीतील अन्य पक्षांना सोबत घ्यावे याचा निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्रवादी आपल्या त्या त्या जिल्ह्यांमधील जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांना देणार असल्याचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले
राज्यातील महापालिका आणि नगर परिषद निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीच्या रुपात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर हे पक्ष स्वतंत्र लढण्याचीच शक्यता अधिक आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत त्या त्या जिल्ह्यात अधिकार देणार असल्याचं अजित पवार म्हणाले.
राज्य स्तरावरच्या आणि इतर महत्वाच्या निवडणुका लढवण्याबाबत वरिष्ठ पातळीवरचे नेते निर्णय घेतात. स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत त्या त्या जिल्हात अधिकार देणार. याबाबत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ आम्ही सर्वजण बैठक घेऊन निवडणुकाबाबत दिशा ठरवू, असं अजित पवार म्हणाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांसह 4 जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केलीय. या कारवाईबाबत महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात येतोय. विरोधकांच्या या आरोपांना अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. ही कारवाई सूडबुद्धीने झालेली नाही. जर तुम्ही भ्रष्टाचार केला नाही तर तुम्ही त्यात सापडू शकता का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलाय. सूडबुद्धीनं कारवाई हे चुकीचं वक्तव्य आहे. त्याला काही अर्थ नाही, असं अजित पवार म्हणाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांवर कारवाई झाली तर आम्ही कारवाई केली. जर आमच्यावर कारवाई झाली तर त्या संस्थेला मुभा आहे म्हणून कारवाई झाली असतं बोलतात. वास्तविक कुणाचं तरी काहीतरी चुकलं आहे म्हणून एसीबीने कारवाई केली आहे. या कारवाईत राजकीय हेतू नाही. प्रत्येकानं पारदर्शकपणे काम करावं ही जनतेची अपेक्षा आहे. कुणी चुकीचं काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं हे एसीबीचं काम आहे. कुठेतरी पाणी मुरत असेल तर त्या लोकांना शासन करणं हे एसीबीच्या कामाचा भाग असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलंय.
अजित पवार यांनी राज ठाकरे प्रकरणाचा द एन्ड केला आहे. पत्रकारांनी राज ठाकरे यांच्यावर अजितदादांना प्रश्न विचारताच शिळ्या कढीला ऊत आणू नका, असं म्हणत अजितदादा पत्रकारांवर संतापले. आमच्या दृष्टीने राज ठाकरेंचा विषय संपला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
बारामतीच्या कोव्हिड परिस्थितीची आढावा बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली.