जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्तन कर्करोग या विकाराचे समूळ उच्चाटन व जनजागृती करणे आवश्यक आहे. आपल्याकडे महिला स्वत:पेक्षा कुटुंबाच्या आरोग्याला प्राधान्य देतात. प्रत्येक घरातील स्त्रीचे आरोग्य उत्तम राहिले तरच कुटुंबाचे आरोग्य सक्षम राहील. स्तन कर्करोग हद्दपार होण्यासाठी प्रत्येक महिलेने स्वतःप्रति जागृत राहावे, वेळोवेळी तपासणी करावी, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या मार्गदर्शनाखाली स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियानाला बुधवारी जागतिक महिला दिनाच्या औचित्याने सुरुवात करण्यात आली. प्रसंगी मंचावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश महाजन, वैद्यकीय महाविद्यालयचे उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, अधिसेविका प्रणिता गायकवाड, जनऔषध वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. योगिता बावस्कर उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून धन्वंतरीदेवीला माल्यार्पण केले. त्यानंतर प्रस्तावनेतून उपक्रमाच्या नोडल अधिकारी डॉ. संगीता गावित यांनी अभियानाविषयी माहिती दिली. तसेच, डॉ. पोटे, डॉ. निकिता खरात यांनीही स्तन कर्करोगाविषयी माहिती दिली. डॉ. अविनाश महाजन यांनी, स्तन कर्करोग थांबविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन कर्करोग हद्दपार केला पाहिजे असे सांगितले.
अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी सांगितले की, अनुवांशिक कारणांमुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. शासकीय रुग्णालयात स्तन कर्करोग निदानासाठी आवश्यक तपासण्या उपलब्ध आहेत. रुग्णांनी लाभ घ्यावा. तसेच, प्रत्येक महिलांनी स्तन कर्करोगबाबत स्वपरीक्षणाविषयी शल्यचिकित्सा विभागातून माहिती घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन डॉ. स्नेहा वाडे यांनी तर आभार डॉ. उमेश जाधव यांनी मानले. प्रसंगी शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, वैद्यकीय महाविद्यालयाचे विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. प्रशांत देवरे, डॉ.आशिष चव्हाण, डॉ. रोहन पाटील, डॉ. सागर कुरकुरे,डॉ. महेंद्र मल, डॉ. विपीन खडसे, डॉ. प्रज्ञा सोनवणे, डॉ.ईश्वरी भोम्बे, डॉ.सुनील गुट्टे यांच्यासह विश्वजीत चौधरी, विवेक वतपाल, राकेश सोनार आदींनी परिश्रम घेतले.