जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पाळधी येथील जवान युवराज हरी भुरे हे भारतमातेची २२ वर्षे प्रदिर्घ सेवा बजावल्यानंतर नुकतेच सेवानिवृत्त होवून स्वगृही परतले आहेत. सेवानिवृत्त झाल्याने पाळधीकरांनी युवराज भुरे यांचे परिवारासह गावातून जल्लोषात मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात आला.
युवराज हरी भुरे हे ९ जानेवारी २००१ ला बेळगाव येथे (मराठा बटालियन) सैन्यात भरती झाले होते. त्यांनी आपल्या सेवेच्या काळात राजस्थान, कोटा, जामनगर, जम्मू काश्मीर, कारगिल, कुपवाडा, पुणे, आसाम, बिहार, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक आदी ठिकाणी २२ वर्षे भारतमातेची सेवा केली. त्यांच्या चागंल्या कामगिरीबद्दल त्यांना सात पदक मिळाले आहेत ते बेळगाव येथे ३१ जानेवारी २०२३ रोजी निवृत्त झाले. दरम्यान, ३ फेब्रुवारीला देशसेवा करून निवृत्त होऊन परतलेल्या युवराज भुरे यांची मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांच्यावतीने गावातून रथामध्ये बसवून मिरवणूक काढली. गावातील चौकाचौकात या सैनिकाचे औक्षण करुन सत्कार करण्यात आला. या वेळी ‘भारत माता की जयल, वंदे मातरमच्या घोषणांनी गाव दणाणून गेले होते, तसेच गावातून सवाद्य मिरवणूक त्यांच्या घरापर्यंत काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये गावातील माजी सैनिक, ग्रामस्थ तसेच युवराज भुरे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी होता. जामनेर तालुक्यात सैनिकांचे गाव म्हणून पाळधी गावाची ओळख आहे. या गावात जवळपास शंभरहून अधिक जवान भारतीय लष्करात आहेत तर त्यापैकी ३५ जवान निवृत्त झाले आहेत.