मुंबई प्रतिनिधी । शेतकरी आंदोलनावरून पॉप स्टार रिहानाला उत्तर देतांना सेलिब्रिटींनी केलेल्या एकसमान ट्विटने संशयकल्लोळ निर्माण झाला असून या प्रकरणी राज्य सरकार चौकशी करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केलं आणि देशभरात एकच चर्चा सुरु झाली. यानंतर अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत असून तसं होऊ देऊ नका असं आवाहन केलं होतं. यातील बहुतांश जणांचे ट्विट हे एकसारखे होते. मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यादरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे.
सेलिब्रिटींवर दबाव टाकण्याता आला होता याबद्दल माहिती घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली. त्यावर अनिल देशमुख यांनी गुप्तहेर विभाग यासंबंधी तपास करणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी खासकरुन अक्षय कुमार आणि सायना नेहवालच्या ट्विटचा उल्लेख करण्यात आला. दोन्ही ट्विटमध्ये असणार्या साधर्म्य आश्चर्यकारक असल्याने या प्रकरणी आता चौकशी करण्यात येणार असल्याचे अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे.