मुंबई (वृत्तसंस्था) सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आता मुंबई आणि बिहार पोलीस यांच्यात जुंपल्याचे चित्र आहे. बिहार पोलीस मुंबई पोलिसांचे समन्वयक अधिकारी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांना भेटायला आले होते. त्यानंतर बिहार पोलिसांना माध्यमांशी बोलण्यास मज्जाव करत धक्काबुक्की करुन गाडीत बसवण्यात आले.
मुंबईमध्ये बिहार पोलिसांचे अधिकारी अंधेरीमध्ये पोलीस उपायुक्तांना भेटायला गेले होते. यानंतर बिहार पोलिसांना मीडियाशी बोलायचे होते, पण मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना माध्यमांबरोबर बोलू दिले नाही. तसेच बिहार पोलीस अधिकाऱ्यांना जबरदस्ती पोलिसांच्या गाडीत घालून मुंबई पोलीस घेऊन गेले. आज सकाळपासूनच बिहारचे मंत्री मुंबई पोलिसांच्या वागणुकीवर आक्षेप नोंदवत होते. मुंबई पोलीस या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करत नाहीयेत, असा आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केला होता. त्यानंतर या घटनेमुळे दोन्ही राज्य सरकारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांची कायदेशीर पातळीवरही कोंडी केली आहे. परवानगी न घेता आणि स्थानिक पोलिसांना न कळवता तपास केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना कायदेशीर समज दिल्याचेही कळते.