मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहेत. याकरता सीबीआय तपासाची गरज नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी बिहारमधील पाटणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकिता लोखंडेने रियाबाबत सुशांतसह झालेल्या आपल्या संवादाचे मेसेज त्याच्या आई-वडिलांना दिले आहेत. तर मुंबई पोलीस आपला जबाब नोंदवत नसल्याचा आरोप सुशांतच्या बहिणीने केला होता. तर त्यांच्या वकिलांना रियाला मुंबई पोलीसमधील एक अधिकारी मदत करत असल्याचा आरोपही केला होता. तसेच भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सीबीआय चौकशीची मागणी जोर लावून धरली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी असे आरोप केले आहेत की, सुशांतने आत्महत्या नाही, तर त्याचा खून झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणीही होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहेत. याकरता सीबीआय तपासाची गरज नाही. त्याचप्रमाणे भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी जे मुद्दे मांडले आहेत, ते त्यांनी प्रत्यक्ष लेखी स्वरुपात द्यावे, त्यावर विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.