मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनवर बलात्कार करुन तिला मारण्यात आले आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा. तसेच सुशांत सिंगने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.
नारायण राणे म्हणाले की, सुशांतच्या घराजवळ एक बंगला आहे. तिथे रोज काही मंत्री येतात. ते तिथे तीन तास काय करतात? १३ तारखेला ते तिथे जमले आणि तिथून सुशांतच्या घरी गेले. तिथे मंत्री गेले असतील तर कॅमेऱ्यात त्यांचा ताफा वगैरेत ते येणार नाहीत. सगळ्यांना माहिती आहे कोण आहे ते, ज्याअर्थी जेवढा दबाव सरकार आणि पोलिसांवर येतोय, अधिकारी वाचवायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी सांगू इच्छितो, हे होऊ शकणार नाही. विरोधी पक्ष सक्षम आहे. तो अशा गोष्टी होऊ देणार नाही, असेही नारायण राणे म्हणाले. सुशांतसोबत १३ तारखेच्या आणि ८ तारखेच्या पार्टीत कोण होतं हे माहिती नाही का? सगळ्या गोष्टी लपवल्या जात आहेत, गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सरकार काम करत आहे. रियाला शोधून चौकशी करावी, दिनू मोर्याच्या घरी पार्टीला मंत्री काय करतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सुशांत सिंह राजपूत प्रकरण हे सध्या गाजत आहे. सरकार या विषयाकडे न पाहता हा विषय दुर्लक्षित कसा करता येईल याचा प्रयत्न करत आहे. सुशांतची आत्महत्या नाही, तर हत्या करण्यात आली आहे. अनेक तज्ज्ञ तेच सांगत आहेत. याप्रकरणी राज्य सरकारची चौकशी ज्या दिशेला चालली आहे, त्यामधून या सरकारला कुणाला तरी वाचवायचं आहे हे दिसत आहे. सुशांतची हत्या झाली, पण याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अद्यापही एफआयआर दाखल केलेला नाही, असे नारायण राणे म्हणाले. तसेच सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्याची पोलिसांनी चौकशी का केली नाही, माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या केली नाही, तर तिची देखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करुन तिला मारण्यात आले आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा, असे नारायण राणे म्हणाले.