Home Cities जळगाव सुप्रीम कॉलनीतील अमृतच्या पंप हाऊसचे कामांची महापौरांकडून पाहणी

सुप्रीम कॉलनीतील अमृतच्या पंप हाऊसचे कामांची महापौरांकडून पाहणी


जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनीत नवीन जलकुंभ आणि पाण्याची टाकी तयार करण्यात येत असून पंप हाऊसचे काम अंतीम टप्प्यात आहे. शनिवारी २ जानेवारीला सायंकाळी महापौर भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी केली असता दीड महिन्यात काम पूर्ण होऊन नागरिकांना प्रत्यक्षात पाणी पुरवठा होणार आहे.

अमृत योजनेंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीची आणि पंप हाऊसच्या कामाचा महापौर गेल्या अनेक महिन्यांपासून आढावा घेत आहे. शनिवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपमहापौर सुनील खडके, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, रियाज बागवान, निता सोनवणे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, सुरेश भापसे, दिलीप सोनवणे, संजय विसपुते, वाहिद खान, आदिल शाह यांच्यासह मनपा अधिकारी उपस्थित होते.

महापौर सौ.भारती सोनवणे यांनी कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला असता पंप हाऊसचा स्लॅब उघडण्यास ८ दिवसांचा कालावधी असून टाकीला तसेच पंप हाऊसचे आतून-बाहेरून प्लॅस्टर करण्यास किमान महिनाभर वेळ लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंप हाऊसचे काम पूर्ण झाल्यावर त्याठिकाणी विद्युत मोटार बसविण्याच्या कामाला पंधरा दिवस लागतील अशी माहिती मक्तेदाराने दिली.

सुप्रीम कॉलनी परिसरात अनेक घरांना पिण्याच्या पाण्याचे संयोजन नसून काही ठिकाणी अवैध नळ संयोजन आहेत. नवीन टाकीवरून अमृत योजनेची जोडणी करण्यात आली असून त्याद्वारेच पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी नवीन नळ संयोजन लवकरात लवकर घ्यावे आणि भविष्यातील त्रास टाळावा असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound